केळी पीकविम्याचे २०१९ चे निकष कायम ठेवा !

केळी पीकविम्याचे २०१९ चे निकष कायम ठेवा !

रावेर : आगामी दोन वर्षांतील केळी फळ पीकविमा योजनेचे निकष ठरविण्यासाठी कृषी आयुक्त कार्यालय, पुणे यांच्यातर्फे बुधवारी (ता. ९) दुसऱ्यांदा केळी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे समजावून घेण्यात आले. आजच्या या ऑनलाइन बैठकीत जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील असंख्य केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि केळी विम्यासाठी २०१९ मधील निकषच कायम ठेवण्याची आग्रही भूमिका घेतली. 

आमदार शिरीष चौधरी आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केळी पीकविम्याचे निकष ठरविताना केळी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे कृषी विभागाने बुधवारी दुसऱ्यांदा ऐकून घेतले. गेल्या आठवड्यात याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. 

यांनी घेतला चर्चेत सहभाग 
या ऑनलाइन बैठकीत जळगाव येथील कृषी कार्यालयातून जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, केळी उत्पादक शेतकरी राजीव पाटील, सुनील कोंडे, रामदास पाटील, मोहन पाटील, आर. व्ही. पाटील, विजय पाटील, शशांक पाटील, सत्त्वशील जाधव, रावेर येथून केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल, धुळे येथून के. डी. पाटील, रावेर तालुक्यातील ऐनपूर येथून अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील, राहुल पाटील, विकास महाजन, अमोल पाटील, स्वप्नील पाटील, कृषी विभागाचे एस. पी. गायकवाड सहभागी झाले होते. पुण्याच्या कृषी आयुक्त कार्यालयातून आयुक्त धीरजकुमार आणि फलोत्पादन संचालक कैलास मोते, दीपाली देवरे, एस. बी. पाटील (गणपूर), भूषण पाटील (कठोरा, ता चोपडा) यांनी चर्चेत भाग घेतला. 

चर्चा सकारात्मक झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या पुढील बैठक ऑनलाइन न घेता शेतकरी प्रतिनिधींना निमंत्रित करून समोरासमोर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा राजीव पाटील यांनी व्यक्त केली, तर दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान झाल्यास निर्यातक्षम केळीला फटका बसतो, त्याची भरपाई मिळण्याची अपेक्षा विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केली. वीस किलोमीटर वेगाचे वारे वाहिले तरीही नुकसानभरपाई मिळण्याची मागणी रामदास पाटील यांनी केली, तर गेल्या वर्षाची भरपाई विमा कंपनीकडून अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही ही हेळसांड थांबविण्याची मागणी सुनील कोंडे यांनी केली. 
 


शेतकऱ्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे 
* केळी पीकविम्याचे निकष २०१९ प्रमाणेच असावेत 
* वेगाच्या वाऱ्याच्या कालावधीत मे, जून, जुलै, ऑगस्टचा समावेश करावा 
* केळी पीकविमा योजनेत केळीवरील करपा आणि सीएमव्ही रोगाचाही समावेश करावा 
* गारपिटीचा कालावधी जानेवारी ते जूनपर्यंत असावा 
* वेगाच्या वाऱ्यामुळे केळीचे नुकसान झाल्यास त्या संबंधित महसूल मंडळातील सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, त्याचे स्वतंत्र पंचनामे करू नयेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com