esakal | मनपा प्रशासन झोपेतच; ट्रेसिंग, टेस्टिंग विलगीकरणापर्यंतच मजल

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation Building
मनपा प्रशासन झोपेतच; ट्रेसिंग, टेस्टिंग विलगीकरणापर्यंतच मजल
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गाची वाटचाल दुसऱ्या टप्प्यात या वेळी अत्यंत तीव्र झाली. जिल्ह्यात सर्वाधिक बाधित व सर्वांत जास्त मृत्यू शहरातीलच. पण या वर्षभरात ट्रेसिंग, टेस्टिंग आणि विलगीकरणाच्या सुविधेपलीकडे महापालिकेची यंत्रणा पोचू शकलेली नाही. पालिकेची रुग्णालये तर आहेत, पण एकही ठिकाण कोविडवरील उपचाराची सुविधा नाही हे दुर्दैवच.

हेही वाचा: ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट’ त्रिसूत्रीचा राऊत पॅटर्न !

गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटी २८ तारखेला जळगाव शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला आणि तेव्हापासून जळगाव शहराचा व पर्यायाने जिल्ह्याचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू झाला. मे महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग तीव्र होऊ लागला आणि महापालिकेच्या यंत्रणेनेही युद्धपातळीवर लढा सुरू केला.

ट्रेसिंग, टेस्टिंगवर भर

एप्रिल २०२० पासून कोरोनाचे बाधित रुग्ण शोधण्यासाठी महापालिका यंत्रणेचे काम सुरू झाले. मे महिन्यापासून हे काम वाढले. जून ते सप्टेंबरदरम्यान संशयितांची चाचणी, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी असे ट्रेसिंग व टेस्टिंग या दोन पातळ्यांवर काम सुरू झाले.

हेही वाचा: अशिक्षितांकडून रॅपिड कोरोना चाचण्या; नागरिकांच्या जिवाशी खेळ

विलगीकरण कक्ष कार्यान्वित

कोरोनाचे रुग्ण जसे वाढू लागले व शासकीय रुग्णालयात बेड अपूर्ण पडू लागले तशी महापालिकेने लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयात टप्प्याटप्प्याने बेड वाढवत विलगीकरणाची व्यवस्था सज्ज केली.

उपचार सुविधेचे काय?

ट्रेसिंग, टेस्टिंग व विलगीकरण कक्ष व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन मात्र महापालिका यंत्रणेचे काम पुढे सरकले नाही. वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध लढा सुरू असताना जळगाव महापालिकेतील तत्कालीन किंवा आताच्या पदाधिकाऱ्यांनाही महापालिकेचे एखादे रुग्णालय कोविड रुग्णांवर उपचारासाठी सज्ज करता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

अन्य शहरात मनपाची रुग्णालये

पुणे, मुंबईच नव्हे तर औरंगाबाद, नाशिक शहरातही या महामारीच्या पार्श्वभूमीवर त्या-त्या महापालिकांनी केवळ विलगीकरण कक्ष नव्हे तर कोविडवर उपचार करणारी रुग्णालये उभारली आहेत. त्या ठिकाणी बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड तसेच उपचार करणारी यंत्रणाही उपलब्ध करून दिली आहे. जळगाव महापालिका मात्र या विषयात पूर्णपणे नापास ठरलीय.

आतातरी मनपा जागी होईल?

दुसऱ्या लाटेत जळगाव शहरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या समोर येत असून, गंभीर रुग्णांचे प्रमाणही कमालीचे जास्त आहे. मृत्युदरही वाढला असून, चिंताजनक स्थिती आहे. रुग्णांना बेड मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे पाच-सहा रुग्णालये ताब्यात असताना महापालिकेने त्यांपैकी एखादे रुग्णालय कोविड रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध करून द्यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महापालिका या दुसऱ्या लाटेदरम्यान तरी त्यासाठी जागी होईल का, असा प्रश्‍न आहे.

हेही वाचा: वृध्द‘सुदामा’भिक्षेकरीला..भगवान श्रीरामांमुळे मिळाला‘महाल’

नाशिक मनपाची रुग्णालये : ०२

उपलब्ध बेडसंख्या : ९००

औरंगाबाद मनपाची रुग्णालये : १५

उपलब्ध बेडसंख्या : ७,७४३

उपलब्ध ऑक्सिजन बेड : ३००

संपादन- भूषण श्रीखंडे