esakal | मनपा ‘ॲक्शन मोड’वर; हॉटस्पॉट, एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये टेस्टिंग
sakal

बोलून बातमी शोधा

covid-19

मनपा ‘ॲक्शन मोड’वर; हॉटस्पॉट, एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये टेस्टिंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील व जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा ‘ॲक्शन मोड’वर सक्रिय झाली आहे. महापालिकेचे चाचणी केंद्र, शहरात पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येणारे हॉटस्पॉट, एमआयडीसीतील कंपन्यांसह नूतन मराठा महाविद्यालयात ‘टेस्टिंग’ सुरू करण्यात आली आहे. याकामी महापालिकेची दहा पथके कार्यरत आहेत.

हेही वाचा: जळगावातील ऑक्सिजन टँक सुरक्षित; २४ तास सुरक्षारक्षक

ऑक्टोबरनंतर नियंत्रणात आलेला कोरोनाचा संसर्ग फेब्रुवारीत पुन्हा एकदा वाढू लागला. फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाची दुसरी लाट सक्रिय होऊन त्यात सुरवातीला जळगाव जिल्हाच सर्वाधिक प्रभावित झाला. त्यातही जळगाव शहराची स्थिती अत्यंत बिकट होती, ती आजही आहे. रोज दोनशे-अडीचशेवर रुग्ण आढळून येत आहेत.

टेस्टिंगवर भर

जळगाव शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनास कार्यवाही गतिमान करण्याचे आदेश दिले. सध्या रुग्णांचे ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर देण्यात येत आहे. शहरातील व पर्यायाने जिल्ह्यातील टेस्टिंग वाढविण्यात आली आहे.

दहा पथकांचे काम सुरू

सध्या शहरात महापालिकेचे शासकीय तंत्रनिकेतनातील तीन चाचणी केंद्र सुरू असून, त्याठिकाणी कोरोनाच्या चाचण्यांसाठी नमुने घेतले जात आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची बसस्थानकावर चाचणी केली जात आहे. तर शहरात पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येणाऱ्या भागाला हॉटस्पॉट ठरवून त्याठिकाणी संबंधित रुग्णाच्या हाय व लो रिस्क संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी केली जात आहे.

हेही वाचा: ब्लॅकने ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन विकणाऱ्या पॅथाॅलाॅजीचा काळाबाजार उघड

...या घटकांची तपासणी

दुसरीकडे नूतन मराठा महाविद्यालयातही चाचणी केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याठिकाणी अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या किराणा दुकानांचे व्यापारी, त्यांच्याकडे कामाला असलेले कामगार, नोकर, भाजीपाला विक्रेते, पार्सल सेवा पुरविणाऱ्या हॉटेल्समधील कामगार आदींची चाचणी केली जात आहे.

एमआयडीसीतही मोहीम

दोन दिवसांपासून महापालिकेने एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये जाऊन तेथील कामगारांची चाचणी मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी (ता. २०) या मोहिमेत सुप्रीम कंपनीत चाचण्यांचे अभियान राबविण्यात आले. असे शहरात जवळपास दहा पथके चाचण्यांसाठी कार्यरत आहेत.

test

test

सर्वांची रॅपिड टेस्ट

राज्य सरकारने लॉकडाउन जारी करताना अत्यावश्‍यक सेवांमध्ये कार्यरत लोकांनी जवळ कोरोना निगेटिव्ह अहवाल बाळगण्याची सक्ती केली आहे. त्यासाठी या घटकातील लोकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात आहे. त्याचा परिणाम लगेच समजतो व पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी पाठविले जाते.

जळगाव शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग बघता विविध पथकांद्वारे लोकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. रोजच्या चाचण्यांची संख्या वाढली असली तरी बाधित रुग्णांचे प्रमाण स्थिर आहे.

-डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, महापालिका

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image