भाजपच्या धर्तीवर राष्ट्रवादीचीही आता पक्षबांधणी 

कैलास शिंदे
Friday, 11 December 2020

पक्षातर्फे संघटन मजबूत करण्यासाठी चांगले वक्तृत्व करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत, यासाठी राज्यभरात वक्ता शिबिर घेण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील चांदसर येथेही हे शिबिर झाले.

जळगाव : संघटन मजबूत करण्यासह चांगले वक्तृत्व करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत, यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यात शिबिर घेण्यात येते, त्यातून चांगले कार्य करणाऱ्यांना जिल्हा, प्रदेश स्तरावर संधी दिली जाते. अगदी त्याच धर्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचेही पक्षबांधणी सुरू असून, पक्षात चांगले बोलणारे वक्ते तयार व्हावेत, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वक्ता शिबिर घेण्यात येत आहे. त्यातील पहिले शिबिर गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील चांदसर येथे झाले.

 

आवश्य वाचा-  कुत्र्यांच्या आवाजाने दरवाजा उघडला, आणि समोरचे दृश्य पाहून थरकाप उडाला ! 

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काय साम्य असेल, तर ते आहे, कार्यकर्ता घडविण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेणे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्तेत असो किंवा विरोधात असो नेहमी अशी शिबिरे घेतली जातात. त्या माध्यमातून चांगल्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना पुढे संधी देण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात प्रथमच युवती शिबिर घेतले. त्या माध्यमातून त्यांनी अनेक युवतींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याशिवाय पक्षातर्फे युवकांसाठीही विविध शिबिरे घेण्यात आली होती. 

पक्षातर्फे संघटन मजबूत करण्यासाठी चांगले वक्तृत्व करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत, यासाठी राज्यभरात वक्ता शिबिर घेण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील चांदसर येथेही हे शिबिर झाले. पक्षाचे जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख व प्रदेश उपाध्यक्ष संजय पवार यांनी संयोजन केले. प्रदेश प्रवक्ता प्रदीप सोळुंके, विकास लंवादे यांनीही मार्गदर्शन केले. पक्षाची बाजू वक्त्यांनी कशी मांडावी, विरोधकांना कसे उत्तर द्यावे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत हे शिबिर झाले. या वेळी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वाचा- दवाखाने उद्या राहणार बंद; 'आयएमए'च्या संपात 'आयुष'चा सहभाग नाही

पक्ष बांधणीचे लक्ष 

वक्ता शिबिराबाबत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व मार्गदर्शक प्रदीप सोळुंके म्हणाले, की सत्ता आल्यानंतर पक्षबांधणीकडे दुर्लक्ष होत असते, २०१४ च्या अगोदर पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे. सत्ता आल्यानतंरही पक्षबांधणीकडे दुर्लक्ष होऊ नये, असा पक्षाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात व विधानसभा मतदारसंघात पक्षाची भूमिका मांडणारे कार्यकर्ते आणि वक्ते तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon NCP is now emphasizing on party affiliation