कामगारांच्या संपामुळे जळगावचे कार्यालयीन काम ठप्प 

कामगारांच्या संपामुळे जळगावचे कार्यालयीन काम ठप्प 

जळगाव : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध नोंदवत कामगार संघटनांनी गुरुवारी पुकारलेल्या एकदिवसीय संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक संघटनांनी संपात सहभागी होत केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध केला. काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत निदर्शने केली. 

महसूल, मध्यवर्ती संघटना 
कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने गुरुवारी संपात सहभाग घेतला. महसूल कर्मचारी संघटना व राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष योगेश नन्नवरे, सहकार्याध्यक्ष दिनकर मराठे, देवेंद्र चंदनकर, सुधीर सोनवणे, महिला प्रतिनिधी छाया तडवी, तर राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मगन पाटील, शिक्षक संघटनेचे विलास नेरकर, कोशाध्यक्ष बी. एम. चौधरी, राज्य संघटक अमर परदेशी, समन्वय समितीचे अध्यक्ष सर्जेराव बेडीसकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास अडकमोल, शशिकांत साळवे, योगेश नन्नवरे, व्ही. जे. जगताप आदी उपस्थित होते. निदर्शनांनंतर संपाबाबतची भूमिका आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

‘सीटू’तर्फे निवेदन 
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनिटन (सीटू) संघटनेने संपात सहभागी होत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला आणि जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. कामगार कायद्यातील कामगारविरोधी बदल रद्द करावेत, शेतकरीविरोधी विधेयके रद्द करावीत, लेबर कोड बिलासह घरेलू कामगार, हमाल-मापाडी कामगार मंडळ, बांधकाम कामगार कल्याणकारी व अन्य मंडळांची प्रभावी अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. 

आयटकतर्फे निदर्शने 
आयटकनेही केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात आयटकप्रणीत ग्रामपंचायत अंगणवाडी गटप्रवर्तक स्त्री परिचर, सीआरपीएफ एलसीआरपी हंगामी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, पर्जन्यमापन कर्मचारी, बचतगट कर्मचारी, वन विभाग कर्मचारी, वीज कामगार संरक्षण कामगार, विमा व बँक कर्मचारी, सुरक्षारक्षक, हंगामी कोविड कर्मचाऱ्यांसह अन्य कामगारांनी सहभाग घेतला. 


हमाल-मापाडी सहभागी 
डॉ. बाबा आढाव प्रणीत जळगाव जिल्हा हमाल-मापाडी कामगार संघटनेने गुरुवारच्या संपात सहभागी होत काम बंद ठेवले. जिल्हाध्यक्ष कॉमेश सपकाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष इंद्रराज सपकाळे, सरचिटणीस शरद चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
हमाल-मापाडी संघटनेच्या मागण्यांमध्ये शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द करावी, मनरेगांतर्गत ६०० रुपये रोज याप्रमाणे किमान २०० दिवस काम अथवा बेरोजगार भत्ता मिळावा यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. 

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सहभागी नाही 
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ या संपात सहभागी झाला नाही. संपाचा निर्णय घेताना कुणालाही विश्‍वासात घेतले नाही, एकतर्फी निर्णय घेऊन संप पुकारला. संपासाठी राज्यातील मागण्या कमी व राष्ट्रीय पातळीवरील मागण्या अधिक व अवास्तव आहेत यासह अन्य कारणे देत महासंघाने संपापासून दूर राहणे पसंत केले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com