esakal | प्रशिक्षण संस्थांना गंडवणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

fraud

प्रशिक्षण संस्थांना गंडवणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव: निती आयोगाची बनावट कागदपत्रे दाखवून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीसह एकूण १८० संस्थांना ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयांनी गंडवल्याचा (Fraud) प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा (police Case) दाखल होवुन टोळीचा म्होरक्या अविनाश ऊर्फ अर्जुन कळमकर या भामट्याला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

हेही वाचा: कलयुगाच्या ‘श्रावणाने’ माता-पित्याला दाखविला मंदिराचा रस्ता


याबाबत योगीता उमेश मालवी (वय ३८, रा. दांडेकरनगर, पिंप्राळा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांची अविनाश कळमकर (रा. देहठेणे, ता. पारनेर जि. नगर) यांच्याशी डिसेंबर २०१८ मध्ये ओळख झाली. त्याने वेळोवेळी संपर्क करुन, माझ्या मायभूमी ग्रामविकास संस्थेला आयकर विभागाची मान्यता आहे, १२ (एए) व ८० जी प्रमाणपत्र प्राप्त आहे. त्या आधारावर वेगवेगळ्या कंपन्यांचा सीएसआर फंड मिळतो व त्यातुन वेगवेगळ्या शासकीय योजना कार्यान्वित करीत असल्याचे कळविले. तसेच, कौशल्य विकास सोसायटीच्या योजना राबविण्यासाठी निती आयोगाची मान्यता असल्याने चालू वर्षासाठी ५ कोटी व आगामी वर्षासाठी ६० कोटींचा निधी मंजूर असल्याचे त्याने सांगितले हेाते.

हेही वाचा: लस टोचल्यानंतर वृद्ध जागीच कोसळला..!‌


३०६ केंद्र चालकाची नोंदणी
कळमकरवर विश्‍वास ठेवुन त्याच्या संस्थेशी आठ शैक्षणीक कोर्स चालविण्याबाबत करार केला. कराराप्रमाणे १७७ संस्थाचालकांनी रोखीने, तसेच बँक खात्यात ३३ लाख रुपये देऊन संस्थेची नोंदणी करवुन घेतली. त्यात पहिल्या ४८ केंद्रांना १५ हजारप्रमाणे, तर १२९ केंद्रांकडून प्रत्येकी २० हजार याप्रमाणे शुल्क आकारण्यात आले. तीन महिन्याचा कोर्स पुर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम मिळणार असल्याचे कळमकर याने सांगितले होते. १७७ केंद्रांनी १९ हजार ८६१ विद्यार्थ्यांची नोंदणी करुन प्रशिक्षण घेतले. त्याच्या परीक्षाही घेण्यात आल्या.


१८० केंद्रचालकांची फसवणुक
अशातच संबंधित संस्थांना बँकेत सेव्हींग व करंट अशी दोन वेगवेगळी खाती उघडण्याचे कारण देत कळककर याने अर्जासह एकूण ४८ लाख ५३ रुपये घेतले. मात्र, बँकेत खातेच उघडले नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण बॅचेस सुरु असतानाच कळमकर याने महीला बचत गटाची योजना सांगत गृहउद्योगाच्या नावाखाली ६७४ बचत गट तयार करुन प्रत्येकी एक हजार याप्रमाणे ६ लाख ७४ हजार रुपये घेतले. त्यानंतर बचत गटांनी तयार केलेल्या साहित्याच्या नावाने प्रति बचत गट ८ हजार रूपये याप्रमाणे ५३ लाख ९२ हजार रुपये पुन्हा गोळा केले. अशापद्धतीने वेळोवेळी वेगवेगळ्या कारणाने योगीता मालवी यांच्यासह १८० केंद्र चालकांना त्याने ९४ लाख १४ हजार ८५३ रुपयांत गंडवले.

हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना टपालाने पाठविल्या गोवऱ्या

दहा संशयीतांवर गुन्हा
दरम्यान, मालवी यांच्यासह १८० प्रशिक्षण केंद्र चालकांनी आपली फसवणुक झाल्याची खात्री पटताच पैशांसाठी तगादा लावला. म्हणुन कळमकरने २०१९ मध्ये ११ कोटी २७ लाखांचा चेक दिला. मात्र, तो वटला नाही. त्यानंतर प्रत्येकी ४ कोटी २० लाख रकमेचे दोन चेक दिले. त्यानंतर २० कोटी, ११ कोटी तसेच ७ कोटी रुपयाचे वेगवेगळ्या तारखांचे धनादेश दिले. मात्र, यातील एकही चेक वटला नाही. अखेर मालवी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन मायभुमी ग्रामविकास संस्थेचा सचिव अविनाश ऊर्फ अर्जुन कळमकर, अध्यक्षा प्रीती विनायक खवले, उपाध्यक्षा प्रमिला अर्जुन कळमकर, खजिनदार कांचन दादाभाऊ ढगे, सदस्य शिवराम आप्पाजी जासूद, संगीता शिवराम जासूद व अर्जुन माधव कळमकर यांच्यासह इतर तीन अशा एकुण दहा जणांविरुद्ध रविवारी (ता. ५) गुन्हा दाखल झाला आहे.

loading image
go to top