विद्यार्थ्यांसाठी उपचारासाठी स्वतंत्र कक्ष उभारा-विभागीय आयुक्त गमे

देविदास वाणी
Wednesday, 25 November 2020

भविष्यात रुग्णांना अधिक ऑक्सीजन लागला तर तुटवडा नको म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँक लवकरात लवकर कार्यान्वित करावी. 

जळगाव ः जिल्हयात कोरोना रुग्णांमध्ये फारशी वाढ नाही. कोरोनाचे नियंत्रण चांगले आहे. आगामी काळात शाळा सुरु करण्याबाबतचे व्यवस्थित नियोजन करावे. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी बाधित आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्डचे नियोजन करावे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशा सक्त सूचना नाशिक विभागीय महसूल आयूक्त राधाकृष्ण गमे यांनी आज आरोग्य यंत्रणेला दिल्या. 

हेही वाचा- जळगावचा ‘फौजदार’अजय देवगण, सुनील शेट्टी सोबत करणार अभिनय
 

जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजार निगडित प्रतिबंधाबाबत आढावा बैठक झाली. 
त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंडे, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आदी उपस्थित होते. 

ऑक्सीजन टँक लवकर करा 
आयुक्त गमे म्हणाले, की भविष्यात रुग्णांना अधिक ऑक्सीजन लागला तर तुटवडा नको म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँक लवकरात लवकर कार्यान्वित करावी. 

जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृत्यूदरही नियंत्रणात येत आहे परंतु अजून कमी होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने वापर करुन अधिकाधिक तपासण्या करण्यात याव्यात. तपासणी अहवाल प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. कोमॉर्बिड आणि हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात राहावे. 

वाचा- महसूल आयुक्त म्हणतात पोलिसांनी वाळू माफीयांना केले हद्दपार -

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. पॉझिटिव्ही रेटही कमी झाला असून रिकव्हरी रेट वाढला आहे. मृत्यू दरही कमी होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह इतर कोविड सेंटरमध्ये आवश्यक तेवढे बेड तयार आहेत. जिल्हा रुग्णालयात लवकरच नॉन कोविड रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँक लवकरत लवकर कार्यान्वित केला जाईल. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon set up a separate treatment room for students