युवकांची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागातील बालकांची दिवाळी केली गोड ! 

संजय पाटील
Friday, 13 November 2020

दुर्गम भागातील हिवरखेडे बुद्रुक (भिलाली) या आदिवासी वस्तीत दिवाळीचा पहिला दिवस आपल्या मित्रपरिवारासह साजरा केला. 

पारोळा : तालुक्यातील धाबे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व त्यांच्या पत्नी चित्रा पाटील हे गेल्या आठ वर्षांपासून विविध प्रकारे दिवाळीचा एक दिवस गरीब आदिवासी बालकांमध्ये साजरा करतात. या वेळीही त्यांनी दुर्गम भागातील हिवरखेडे बुद्रुक (भिलाली) या आदिवासी वस्तीत दिवाळीचा पहिला दिवस आपल्या मित्रपरिवारासह साजरा केला. 

आवश्य वाचा- कोरोनाने अनेकांना बनविले ‘वाहनमालक’! 

या वेळी फटाके मुक्त व पर्यावरणपूरक दिवाळीसह आरोग्यदायी दिवाळी साजरा करताना शहरातील छायाचित्रकार व्यावसायिक आकाश महाजन यांनी ४५ शालेय बालकांना टूथ पेस्ट, ब्रश, साबण, शाम्पू, सुंगधी खोबरे तेल, व्हॅसलिन अशा आरोग्य किटचे वाटप केले. तसेच पारोळा तालुका शिव छावा संघटनेचे अध्यक्ष कपिल चौधरी यांनी ७० बालकांना फराळ व मिठाई वाटप केला. चित्रा पाटील यांनी बालरक्षक म्हणून मास्क व सॅनिटायझर भेट दिले. चोरवड येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे सुनील साळुंखे यांचे चिरंजिव साहिल साळुंखे यांनी बालकांना बिस्किट पुडे वाटले. याप्रसंगी पंडीत नेहरू व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच वसुबारस असल्याने गाय वासरूचेही पूजन उपस्थित महिलांनी केले. 

या उपक्रमास पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील, वैशाली पाटील, प्रतिभा चौधरी, शारदा महाजन, सुनंदा अशोक महाले, बापू महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला सिद्धराज साळुंखे, मयुर गवांदे, सुप्रभा साळुंखे, जान्हवी क्षत्रिय यांचे सहकार्य लाभले. 
 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon youth social activities distributed diwali literature to children in remote areas