जामनेरच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालन ‘बीव्हीजी’कडे 

जामनेरच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालन ‘बीव्हीजी’कडे 

जळगाव  : टेलिमेडिसिन, टेलिकन्सल्टिंगसह टेलिऑपरेटिंगची सुविधा असलेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जामनेर येथे जी.एम. हेल्थ केअर व ग्लोबल महाराष्ट्र ट्रस्टअंतर्गत साकारले असून, हा राज्यातील अशा स्वरूपाचा पहिलाच प्रयोग आहे. औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या धर्तीवर हे हॉस्पिटल साकारले असून, त्याचे संचालन विख्यात ‘बीव्हीजी’ समूहाकडे, तर तांत्रिक बाजूची जबाबदारी जिओ-रिलायन्सकडे आहे. 


औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातही आरोग्यातील सेवाकार्य असावे, त्यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. आरोग्यदूत म्हणून राज्यात लौकिक मिळविलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांनी हे कार्य मनावर घेतले. जामनेरात अशा प्रकारचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा संकल्प सोडला आणि तो सिद्धीसही नेलाय. 

तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य 
जामनेर शहरात बीओटी तत्त्वावर बांधलेल्या संकुलात या हॉस्पिटलसाठी जागा देण्यात आली आहे. हॉस्पिटलचे स्वरूप, तेथील सेवा-सुविधा, यंत्रणा, वैद्यकीय व अन्य स्टाफ यासंबंधी डॉ. हेडगेवार रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्था करण्यात आल्या आहेत. 

संचालन ‘बीव्हीजी’कडे 
हॉस्पिटलमधील सेवा-सुविधा दर्जेदार असाव्यात, कामकाज अत्यंत शिस्तीने व लोकाभिमुख पद्धतीने चालावे, रुग्णांसह त्यांच्या नातलगांना कुठलीही असुविधा होऊ नये म्हणून हॉस्पिटलशी संबंधित नॉन-मेडिकल सुविधांचे संचालन देशभरात विख्यात ‘बीव्हीजी’ समूहाकडे सोपविण्यात आले आहे. या समूहाने हॉस्पिटलमधील कर्मचारी वर्ग भरण्याची प्रक्रियाही सुरू केली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीचा विषय स्वत: जी. एम. हेल्थ केअर बघणार आहे. 

टेलिमेडिसिन, ऑपरेटिंग 
जामनेरसारख्या ग्रामीण भागात मुंबई, पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टर प्रत्यक्षात येऊन सेवा देऊ शकत नाहीत. त्यामुळे तेथील विख्यात व तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा टेलिमेडिसिन, टेलिकन्सल्टिंग, टेलिऑपरेटिंग यंत्रणेच्या माध्यमातून या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होईल. या सर्व तांत्रिक बाजूंची जबाबदारी ‘रिलायन्स-जिओ’कडे असेल. विविध मोठ्या हॉस्पिटल, संस्थांशी जुळलेले तज्ज्ञ या ठिकाणी सेवा देणार आहेत. 


हॉस्पिटलचे लवकरच लोकार्पण 
कोरोना संसर्गामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरू असून, ते अद्यापही पूर्णपणे अनलॉक झालेले नाही. त्यामुळे सर्व सुविधांनी सज्ज असे हे हॉस्पिटल लोकार्पणासाठी तयार असले तरी त्याचे उद्‍घाटन अद्याप होऊ शकलेले नाही. लवकरच या सेवाप्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. 


आत्मनिर्भरतेकडे पाऊल 
कोविडच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडून, त्याबाबत आवाहन केले आहे. चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधेबाबत जामनेर तालुका व पर्यायाने जळगाव जिल्हाही आत्मनिर्भर व्हावा, या क्षेत्रातील नागरिकांना मुंबई-पुण्याच्या आरोग्य यंत्रणेवर विसंबून राहता येऊ नये म्हणून गिरीश महाजनांनी या हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवून ती पूर्णही करत आत्मनिर्भरतेकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.  

 संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com