खडतर प्रवास करीत ध्येयवेड्या शिक्षकाचे फिरते वाचनालय 

शंकर भामेरे 
Thursday, 15 October 2020

ध्रुवास राठोड यांच्या वाचन संस्कार संबंधित अभिनव उपक्रमाची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देखील दखल घेत ‘आपले जिल्हा आपले उपक्रम’ या नावीन्यपूर्ण पुस्तकात त्यांच्या उपक्रमाला स्थान दिले आहे.

पहूर (ता. जामनेर) : आयएसओ मानांकित अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, डेराबर्डी चाळीसगाव येथील ध्येयवेडा शिक्षक तथा हिंगणे बुद्रूक (ता. जामनेर) येथील सुपुत्र ध्रुवास ममराज राठोड यांच्याकडून वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ‘वाचन संस्कार’ सप्ताह राबविला जात आहे. या अंतर्गत फिरते बालवाचनालयाचा कौतुकास्पद उपक्रम या उपक्रमशील शिक्षकाकडून अनेक तांडा, वाडी वस्तींचा खडतर प्रवास करून राबविण्यात येत आहे. 

मोठा दिलासा; जळगाव जिल्ह्यातील दुकाने आता सात ही दिवस खुली राहणार ! 
 

वाचन हे प्रगतीचे लक्षण व सर्वांगीण विकासाचा पाया समजले जाते. यासाठी शिक्षक राठोड शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार व्हावेत, विचार क्षमता वाढीस लागावी, त्यांच्या ठायी समृद्ध अशी अभिरुची, उच्च दर्जाची रसिकता आणि संवेदनशीलता हे मूल्य रुजविण्याच्या हेतूने वाचनाची गोडी निर्माण करणारा वाचन संस्कार हा उपक्रम अनेक नावीन्यपूर्ण आकर्षक शैक्षणिक साहित्यांची निर्मिती करून शाळेत राबवीत असतात. परंतु कोविड-१९ च्या काळात अवांतर वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब राठोड जाणून होते. राठोड अनेक दिवसांपासून स्वखर्चाने हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास करून विद्यार्थ्यांच्या दारी शिक्षण पोचविले आहेत. हा खडतर प्रवास अविरतपणे सुरू असून, यासह वाचन प्रेरणा दिनानिमित्त फिरत्या बालवाचनालयाचा कौतुकास्पद उपक्रम राबवीत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कृतिप्रवण ठेवून देण्यात आलेल्या पुस्तकामधून कोणता बोध घेण्यात आला. याविषयी पुस्तकाचे परीक्षणही विद्यार्थ्यांना करावयास सांगण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा मिळावी, यासाठी राठोड यांची धडपड पाहून विद्यार्थी पालकांकडून कौतुक होत आहे. 

विशेष उपक्रम म्हणून गौरव 
ध्रुवास राठोड यांच्या वाचन संस्कार संबंधित अभिनव उपक्रमाची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देखील दखल घेत ‘आपले जिल्हा आपले उपक्रम’ या नावीन्यपूर्ण पुस्तकात त्यांच्या उपक्रमाला स्थान दिले आहे. या अभिनव शैक्षणिक कार्याचे समाज कल्याण साहाय्यक आयुक्त योगेश पाटील, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र महाजन, मुख्याध्यापक श्री. सावळे व शिक्षकवृंदाकडून कौतुक करण्यात आले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner self-funded mobile library for the purpose of educating children