पोस्टमनदादा गाढ झोपेत आणि चोरट्यांचा घरात धुमाकूळ !  

दिपक कच्छाव
Wednesday, 21 October 2020

समाधान महाजन यांनी किचन रूममध्ये जावून पाहीले असता किचनच्या मागील लाकडी दरवाजाचा कडीकोंडा तोडून दरवाजा तोडलेला होता.तर लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले होते.

मेहुणबारे(ता.चाळीसगाव) ः शहरात चोर्यांचा सुळसुळाट सुरुच असून खरजई रोडवरील नाका परिसरातील संताजीनगरध्ये पोस्टमनच्या घरावरच चोरट्यांनी धुमाकूळ घालत  किचनचा दरवाजा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे 1 लाख 34 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड रक्कम असा ऐवज लंपास केला. या धाडसी घरफोडीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.महाजन यांच्या घराशेजारील गायत्री कदम यांच्याकडेही चोरी झाली आहे.

आवश्य वाचा- माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीसांनी पोलिसांना केला फोन - खडसे
    
या घटनेची माहिती अशी की, समाधान रघुनाथ महाजन हे चाळीसगाव पोस्ट खात्यात पोस्टमन आहेत.(ता.19)रोजी रात्री 10.30 वाजता महाजन, त्यांची पत्नी व शालक अशांनी जेवण करून पुढच्या रूममध्ये झोपण्यास गेले.त्यांच्या मागील किचनच्या रूममध्ये असलेले लोखंडी कपाट सुस्थितीत होते.पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी कोमल महाजन यांनी त्यांना झोपेतून उठवून सांगितले की, घरात चोरी झाली आहे. समाधान महाजन यांनी किचन रूममध्ये जावून पाहीले असता किचनच्या मागील लाकडी दरवाजाचा कडीकोंडा तोडून दरवाजा तोडलेला होता.तर लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले होते.कपाटातील लोखंडी लॉकर कशाने तरी तोडून लॉकरने ठेवलेले 50 हजार रूपये किंमतीचे दोन तोळे वजनाची सोन्याची पोत, 18 हजार रूपये किंमतीच्या 6 ग्रॅम वजनाच्या कानातील दोन सोन्याच्या रिंगा, 15 हजार रूपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 21 हजार रूपये किंमतीची 7 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या व रोख रक्कम 30 हजार रूपये असा 1 लाख 34 हजार रूपयांचा ऐवज(ता.19)चे रात्री 10.30 ते दि.20 रोजी सकाळी 6वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घराचा कडीकुलूप तोडून लबाडीच्या इराद्याने चोरून नेला.चोरट्यांनी आपला मोर्चा महाजन यांच्या घराच्या पुढे राहणाऱ्या गायत्री जयराम कदम यांच्या घरीही चोरी केली.मात्र त्यांच्याकडे किती रूपयांची चोरी झाली हे समजून आले नाही.

वाचा- देवेंद्र फडणवीसांनी माझे आयुष्य उद्धवस्थ केल्यामुळेच भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला - खडसे
    

याप्रकरणी समाधान महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपींच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खरजईनाका भागात लागोपाठ घरफोड्या झाल्याच्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare Thieves broke into a postman's house in Mehunbare and stole jewelery worth lakhs of rupees