esakal | इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


पाचोरा : देशभरात सातत्याने सुरू असलेल्या पेट्रोल (Petrol), डिझेल, गॅस दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती याविरोधात शिवसेनेने (Shiv Sena) डरकाळी फोडली आहे. भाववाढीचा निषेध करत भाववाढ कमी करण्याच्या मागणीसाठी पाचोरा तालुका शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले.

(pachora shiv sena movement against price hike)

हेही वाचा: खडसेंना धक्का..भाजपचे पण खडसेसमर्थक ६ नगरसेवक सेनेत !


निवेदनाचा आशय असा, की कोरोनाच्या (corona) संकटामुळे अनेकांच्या नोकरी, धंद्यांवर गदा आली असून, मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाले आहेत. जगावे कसे, असा यक्ष प्रश्न भेडसावत आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सतत पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सुरूच आहे. यामुळे प्रचंड महागाई वाढलेली आहे. जनता महागाईमुळे होरपळून निघत आहे. यामुळे केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला असून, शिवसेना खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभी असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. मोदी सरकारने महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या वेळी शिवसेना शहरप्रमुख किशोर बारावकर, मुकुंद बिल्दीकर, प्रवीण ब्राह्मणे, हरिभाऊ पाटील, रवींद्र मराठे, विजय भोई, महिला आघाडीच्या मंदा पाटील, सुनंदा महाजन, ऊर्मिला शेळके, किरण पाटील, रेखा राजपूत, स्मिता बारवकर उपस्थित होते.


‘भूमिअभिलेख’वरही धडक
मुकुंद बिल्दीकर यांच्या नेतृत्वाखाली सेना पदाधिकाऱ्यांनी भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक भोये यांची भेट घेत शहर भूमापक (स्व.) कुलकर्णी यांच्या रिक्त जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती न झाल्याने नाराजी व्यक्त करत तातडीने या पदाचा कार्यभार स्वतंत्र कर्मचाऱ्यांना द्यावा, जनतेची कामे रेंगाळू देऊ नका, अशी मागणी करत शिवसेना स्टाइल आंदोलनाचा इशारा दिला. तसेच शहरातील सुमारे तीन हजार ५०० अतिक्रमित घरे नावावर करण्यासंदर्भात सुरू असलेली प्रक्रिया संथगतीने का सुरू आहे? असा जाब अधीक्षक भोये यांना विचारला. कोरोना परिस्थितीमुळे काम थांबले असल्याचे त्यांनी सांगत शासनाचा पुढील आदेश आल्यास तत्काळ मोजणीचे काम पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी मुकुंद बिल्दीकर, किशोर बारावकर, प्रवीण ब्राह्मणे, प्रकाश पवार उपस्थित होते.