esakal | केळी वाहतुकीतून रेल्वेला 19 कोटी रुपये उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Banana wagons

केळी वाहतुकीतून रेल्वेला 19 कोटी रुपये उत्पन्न

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील दोन रेल्वे स्थानकांमधून (Railway stations) नवी दिल्ली (New Delhi) येथे गेल्या पाच महिन्यात रेल्वे वॅगन्सद्वारे (Railway wagons) १ लाख टनांपेक्षा जास्त केळी वाहतूक (Banana transport) करण्यात आली आहे; यातून रेल्वेला तब्बल १८ कोटी रुपयांपेक्षाही जास्त उत्पन्न भाड्यापोटी मिळाले असून आता रेल्वेने पंजाब, जम्मू आणि नवी मुंबईसाठी देखील किसान रॅक सुरु करावा अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. रेल्वेने मोठ्या प्रमाणावर केळी वाहतूक झाल्यामुळे यावर्षी केळीचे भावही बऱ्यापैकी टिकून राहिल्याचे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे (Farmers) म्हणणे आहे.

हेही वाचा: अशी वेळ आतापर्यंत अनुभवली नाही..!


२०१३ मध्ये वातानुकुलित वॅगन्स (एअर सर्क्युलॅटेड वॅगन्स) बंद झाल्यावर २०१४ मध्ये काही काळ व्हीपीयू प्रकारच्या वॅगन्स मधून केळी वाहतूक नवी दिल्ली येथे सुरू होती. मात्र नंतर ती वाहतूकही बंद पडली. त्यानंतर तब्बल सात वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर तालुक्यातून दिल्ली येथील नया आझादपूर येथे केळी वाहतूक सुरू झाली आहे. यासाठी सावदा स्टेशन शेतकरी व व्यापारी मंडळाचे अध्यक्ष डी. के. महाजन व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले आहेत. एप्रिल २०२१ मध्ये आधी तालुक्यातील सावदा रेल्वे स्थानकावरून केळी वॅगन्स भरण्यास सुरुवात झाली. आज पर्यंत तेथून बीसीएन प्रकारच्या वॅगन्समधून ४५ रॅक म्हणजे १८९० वॅगन्स केळी वाहतूक झाली आहे. तर व्हीपीयू प्रकारच्या वॅगन्सच्या १४५ रॅक मधून २९०० वॅगन्स केळी वाहतूक झाली आहे. या दोन्हीतून सावदा रेल्वे स्थानकातून तब्बल ९१ हजार टन इतकी केळी वाहतूक झाली. त्यापोटी रेल्वेला १६ कोटी रुपयांपेक्षाही जास्त भाडे मिळाले आहे.

Railway Banana wagons

Railway Banana wagons

केळी कामगारांना मोठा रोजगार

रावेर रेल्वे स्थानकावरून केळी वाहतूक थोडीशी उशिरा सुरू झाली येथून व्हीपीयु व जीएस प्रकारच्या वॅगन्समधून ४२ रॅक केळी वाहतूक झाली. त्यातून सुमारे १६ हजार टन केळी वाहतुकीतून रेल्वेला सुमारे २ कोटी ७५ लाख रुपये भाड्यापोटी मिळाले आहेत. या दोन्ही रेल्वे स्थानकातून गेल्या ५ महिन्यात १ लाख १० हजार टन केळी वाहतूक झाली.यातून रेल्वेला १८ कोटी ७६ लाख ९५ हजार रुपये भाड्यापोटी मिळाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर केळी वाहतूक झाल्याने येथील केळीचा पुरवठा कमी होऊन यावर्षी केळीचे भावही बर्‍यापैकी टिकून राहिले आहेत तसेच डिझेलच्या भावात वाढ होऊनही ट्रकच्या दिल्ली भाड्यात वाढ झालेली नाही. या दोन्ही रेल्वेस्थानकांवर शेकडो केळी कामगारांना मोठा रोजगारही मिळाला. रेल्वेमुळे स्वस्त, जलद व सुरक्षित केळी वाहतूक शक्य झाली.

हेही वाचा: ‘त्या’ महसूल मंडळांना आगाऊ २५ टक्के रक्कम


शेतकऱ्यांच्या अपेक्षा
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रेल्वे किसान रॅकमधून इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून दिल्यानंतर शेतकऱ्यांनीही रेल्वेकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. नवी मुंबई, जम्मु आणि अमृतसर किंवा पठाणकोट या तीनही ठिकाणांसाठी आठवड्यातून एक वेळा रॅक मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. सध्या रेल्वे विभाग शेतकऱ्यांसाठीचा हा किसान रॅक विविध रेल्वे स्थानकांवरून उपलब्ध करून देते तर नवनवीन बाजारपेठेत केळी पोहोचवण्यासाठीही रेल्वेने रॅक सुरू करावेत तसेच कानपूर या पारंपारिक बाजारपेठेसाठी देखील रेल्वे वॅगन मिळाव्यात अशी अपेक्षा रावेर शेतकरी फळबागायतदार युनियनचे माजी उपाध्यक्ष हरीश गनवाणी, अध्यक्ष रामदास पाटील आणि उपाध्यक्ष किशोर गनवाणी यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: खरेदीपूर्वीच मलिदा लाटणाऱ्या आरोग्य विभागाचे पितळ उघड


केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा
* रेल्वे वॅगन्स पुरवठा करतांना ज्यांनी ही केळीची पुरवठा- विक्रीची यंत्रणा उभी करण्यासाठी दीर्घकाळापासून योगदान दिले त्यांना आणि स्थानिकांना प्राधान्य मिळावे.
* रावेर माल धक्क्यावर पूर्ण लांबीचा फलाट नसल्याने केळी वॅगन्समध्ये भरतांना अडचणी येतात तो मालधक्का व त्यावर शेड बांधून मिळावे.
*किसान रॅकला दर तीन महिन्यांनी मुदतवाढ घ्यावी लागते हे धोरण बदलून पूर्ण वर्षभरासाठी परवानगी द्यावी.
* सध्या निंभोरा येथून केळी भरण्यास वॅगन्स उपलब्ध नाहीत त्या उपलब्ध व्हाव्यात.
* रावेर आणि सावदा या दोन्ही रेल्वे स्थानकावर मिळून रोज एक म्हणजे आठवड्यात ७ रॅक उपलब्ध व्हावेत.

loading image
go to top