शौचालय बांधले तेही स्‍मशाभूमीत; ग्रामपंचायतीचा कारनामा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

स्मशानभूमीत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू असताना ते त्वरित बंद करून अन्य ठिकाणी करावे, यासाठी २२ जूनला बौद्ध समाजबांधवांनी वडगाव येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज दिला होता;

सावदा (जळगाव) : वडगाव- निंभोरा रस्त्यावरील बौद्ध समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीत वडगाव ग्रामपंचायतीने अनधिकृत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम केले आहे. या बांधकामासंदर्भात बौद्ध समाजातील बांधवांनी अनेकदा तक्रारी देऊनही ग्रामपंचायतीने व ग्रामसेवकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. 

हेपण वाचा- कोरोनावरील रेमडेसिवर इंजेक्शनचा जिल्ह्यात काळा बाजार

स्मशानभूमीत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू असताना ते त्वरित बंद करून अन्य ठिकाणी करावे, यासाठी २२ जूनला बौद्ध समाजबांधवांनी वडगाव येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज दिला होता; परंतु त्या अर्जावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यानंतर समाजातर्फे पुन्हा १० ऑगस्टला स्मरणपत्र देण्यात आले. त्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, तसेच ३० जूनला रावेर येथील गटविकास अधिकाऱ्यांनाही तक्रारअर्ज देण्यात आला आहे. त्यांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. जागेचा तपशील भूमापन क्रमांक ३२४ /अ /१ असा असून, ती जमीन बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी राखीव आहे, तसेच या जागेत अनेक दशकांपासून मृतदेहही पुरलेले असून, बौद्ध समाजबांधवांच्या भावनेचा प्रश्न आहे. तरीदेखील या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप बौद्ध समाजबांधवांनी केला आहे. 
 
शौचालयाचे बांधकाम बौद्ध स्मशानभूमीत न करता इतर ठिकाणी करायला हवे होते. कारण, हा समाजाच्या भावनेचा प्रश्‍न आहे. ही जागा अंत्यविधीसाठी आहे, तसेच तेथे वीजदिव्यांची व्यवस्था नाही, बसण्यासाठी बाके नाहीत. ते सोडून शौचालयच का? 
सुरेश वाघोदे, ग्रामस्थ 
 
बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवर सार्वजनिक शौचालय बांधणे म्हणजे हा प्रकार अतिक्रमण झाला असून, असंख्य लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 
- किशोर लहासे, ग्रामस्थ 

ग्रामसेवकांना आणि सरपंचांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी यासंदर्भात कोणतेही म्हणणे ऐकून घेतले नाही, तर उलट उडवाउडवीची उत्तरे देत बांधकाम सुरू ठेवले आणि बौद्ध समाजबांधवांच्या भावनेशी खेळले. 
- आनंदा वाघोदे, ग्रामस्थ 
 
ही जमीन फार पूर्वीपासून बौद्ध समाजाच्या अंत्यविधीसाठी देण्यात आली आहे. यावर सार्वजनिक शौचालय बांधण्याचा ग्रामपंचायतीला कोणताही अधिकार नाही. तेथे शौचालय बांधणे चुकीचे आहे. 
- सचिन वाघोदे, ग्रामस्थ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news savda gram panchayat toilets were built in the cemetery