जळगाव शहरात हत्यांचे सत्र सुरूच; दगडाने ठेचून तरुणाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

जळगाव शहरात हत्यांचे सत्र सुरूच; दगडाने ठेचून तरुणाचा खून

जळगाव : शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटच्या पलीकडे रेल्वे मालधक्क्यावर गुदामासमोरच एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता. २५) मध्यरात्री घडली. मृताच्या कुटुंबीयांनी कपड्यावरून मृतदेहाची ओळख पटवली असून, अनिकेत गणेश गायकवाड असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळील रेल्वे मालधक्का परिसरातच गुदामासमोर मध्यरात्री एका तरुणाचा खून झाल्याची माहिती कळल्यावर शहर पोलिस ठाण्यातील रात्री गस्तीवरील पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: हेडफोन घालून रुळ ओलांडताना रेल्वेनं उडवलं; नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

आधी पटवली ओळख

परिसरात चौकशी करून त्यांनी राजमालतीनगरातील काही हमालांना बोलावून या मृतदेहाबाबत माहिती दिल्यावर एकाने मृत तरुणाचे घर पोलिसांना दाखविले. पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी मृताच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिल्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास दूध फेडरेशनपलीकडील राजमालतीनगरातील रहिवासी, मालधक्क्यावर हमाली करणारे गणेश रमेश गायकवाड (वय ५०) यांच्यासह कुटुंबीयांनी धाव घेतल्यावर मृत तरुण अनिकेत मुलगा असल्याचे सांगत आक्रोश केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्‍हा सामान्य रुग्णालयात हलविला. सकाळी मृतदेहाचे विच्छेदन करून कुटुंबीयांना मृतदेह सोपविण्यात आला. याबाबत मुलाचे वडील गणेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

असा उघडकीस आला प्रकार

मध्यरात्री अडीचला गणेश गायकवाड यांच्या घराचे दार वाजले. गल्लीतील अर्जुन धोबी यांनी आरोळ्या मारून गायकवाड कुटुंबीयांना जागे केले. घटनेचे वृत्त सांगितल्यावर कुटुंबाने घटनास्थळाकडे धाव घेतली. हत्या केल्यानंतर डोके दगडाने ठेचून निर्घृण पद्धतीने मारण्यात आल्याने मृतदेहाचा चेहरा छिन्नविछिन्न झाला होता. अनिकेतच्या वडिलांनी अंगावरील कपडे व पायातील काळा दोरा यावरून मृतदेहाची खात्री केल्यावर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

अनैतिक संबंधातून खून?

खुनानंतर शहर पोलिसांनी बाळू समुद्रे यांचा मुलगा सागर व सुमीत शेजवळ यांना रात्री ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले संशयित दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. त्यांनी अनिकेत गायकवाड याचा खून नेमका कोणत्या कारणासाठी केला याबाबत माहिती दिली नाही. त्यांची सखोल चौकशी करून खुनाच्या कारणांचा शोध घेतला जाणार असून, अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची प्रथमदर्शनी शंका व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Jalgaon : मारहाणीत तरुणाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर

कुटुंबाची परिस्थिती बेताची

अनिकेतचे वडील गणेश गायकवाड मालधक्क्यावरच हमाली करतात. आई सारिका गृहिणी आहे. अनिकेत व त्याचा भाऊ विशाल मिस्तरीकाम करतात. हातावर पोट असणारा हा परिवार आहे. रोजचे काम करून येणाऱ्या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह चालायचा.

Web Title: Murder Of Young Boy In Jalgaon City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top