नंदुरबारमध्ये घरफोडी; चोरटे शेतातून पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी

नंदुरबारमध्ये घरफोडी; चोरटे शेतातून पसार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निमगूळ : नंदुरबार शहरात चोरी करून शहादा परिसरात एका कारसह चोरटे असल्याची कुणकुण पोलिसांना दुपारी दोनच्या सुमारास लागली आणि पोलिस-चोरट्यांमध्ये पाठलागाचा खेळ सुरू झाला. अनरद येथे चोरट्यांनी पोलिसांना पुन्हा हुलकावणी दिली आणि ते निसटले.

पोलिसांनी सारंगखेडा येथे ट्रॅक्टर व मोटारसायकली आडव्या लावल्या. मात्र, मोटारसायकलला धडक देत पुलावरून कसरत करत कार टाकरखेडा येथून वडदे-चावडदेकडे भरधाव निघाली. त्यांना पुढे रस्ता कसा आहे याचा अंदाज आला नाही. एकीकडे मोठे तापी नदीपात्र, अरुंद रस्ता असतानाही चोरट्यांनी कार वेगाने पुढे नेली. वडदे सोडल्यानंतर चावडदेकडे वेगाने जात असताना, वळणावर बाभळीत कार फसली. चोरीच्या दोन बॅगा घेत चोरटे उसाच्या शेतात लपले. त्यामागे पोलिस होते. तोपर्यंत वडदे आणि चावडदे येथील ग्रामस्थ कारजवळ गर्दी करून होते.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिस आले आणि रस्त्यावरच उभे राहिले. शेतात जायची कुणाचीही हिंमत झाली नाही. नेहमीप्रमाणे अधिकारी आले. तेही पाहणी करत निघाले. दोंडाईचा पोलिस ठाण्याला माहिती मिळाली की चोरटे हद्दीत घुसले आहेत. त्यामुळे दोंडाईचा पोलिस निरीक्षकांनी रस्त्यावरूनच पाहणी केली. शेतात जाईल कोण, हा प्रश्‍न अनुत्तरित राहिला. पोलिसांकडे अंधार पडण्याआधी तब्बल दीड तास असताना, सर्च ऑपरेशन राबविले गेले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यतत्परतेचा अभाव जाणवला. ग्रामस्थांना सांगितले असते, तर त्या क्षेत्राला घेराव घालून चोरट्यांना पकडता आले असते. मात्र, पोलिसच रस्त्यावर राहिले, शेतात गेले नाहीत, मग ग्रामस्थांनी का जीव धोक्यात घालावा, असा सवाल उपस्थित केला गेला. पोलिस रात्री टाकरखेडा-निमगूळजवळच्या मळ्यात गस्त घालत होते.

संबंधित शेतातून पुढे जायला मोठी खाई ओलांडावी लागणार होती. चोरटे दोन आणि चार पोलिस ठाण्यांचे पथक मागावर असतानाही कुणी शेतात जाण्यास धजावले नाही. दुसऱ्या दिवशीही पोलिस यंत्रणा शोधकामी राबत असल्याचे चित्र होते. मात्र, मोठी पिके असल्याने चोरटे कुठे पसार झाले त्याचा थांगपत्ता लागला नाही.

loading image
go to top