Jalgaon : उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी धास्तावले | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Outbreak of Tambera disease on sugarcane in the field in the area

Jalgaon : उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी धास्तावले

मेहुणबारे (जि. जळगाव) : गिरणा परिसरातील चाळीसगाव तालुक्यात काही भागात लागवड झालेल्या उसावर ‘तांबेरा’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्यामुळे उसाची पाने तपकिरी रंगाची होत आहे. सुरुवातीला एक, दोन शेतांमध्ये असे चित्र दिसत होते.

मात्र, आठ- दहा दिवसांपासून चाळीसगाव व भडगाव तालुक्यातही शेतांमध्ये लागवड झालेल्या उसावर या रोगाचा फैलाव होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. (outbreak of Tambera disease on sugarcane scares farmers Jalgaon Latest Marathi News )

मेहुणबारे परिसराला गिरणा नदी वरदान ठरली आहे. गिरणा पट्ट्यात पाण्याची उपलब्धता असल्याने या भागात ऊस व केळीची चांगली लागवड झाली आहे. सध्या गिरणा परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नसल्याने उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात पाच हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे.

यापैकी दोन हजार हेक्टर उसावर या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. मागीलवर्षी कपाशीवर पडलेल्या बोंडअळीच्या संकटातून शेतकरी बाहेर पडत नाही, तोच पुन्हा उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. उसाची हिरवी पानेही चिकट व तपकिरी रंगाची होत आहेत. त्यातच उसाची पाने करपण्याची लक्षणे उसावर दिसत आहे.

आता या रोगाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. वरखेडे भागातही या रोगाने डोके वर काढले आहे. बहुतांश शेतकरी उसाचे दुबार पीक खोडवा म्हणून राखून ठेवतात. त्यावर बऱ्यापैकी खर्च झालेला असतो. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी महागडी औषधी घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत.

मात्र, काहीएक फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती पाहता, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. या भागातील नदीकाठावरील तसेच डोंगराशेजारील शेतांमध्ये तांबेराचे प्रमाण अधिक आहे.

हेही वाचा: पाण्यासाठी घोटीकरांची वणवण; पाणीपुरवठा योजनेला मंत्रालयीन निर्णयाची प्रतिक्षा

सतत रासायनिक खतांचा वापर, नवीन संकरित जातीचा ऊस, उसाच्या सरीतील कमी अंतर, युरिया खताचा अधिक वापर यामुळे ऊस पिकावर तांबेरा रोग पडल्याचे शेतीतज्ज्ञांचे मत आहे. सद्यःस्थितीत तांबेरा कमी होण्यासाठी नैसर्गिक उपचार पावसाची उघडीप होणे हाच आहे. तर औषध फवारणी करणे हा कृत्रिम उपाय आहे.

शेतकरी द्विधा मनःस्थितीत

कपाशीचे पीक घेतले तर बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि उसाचे पीक घेतले तर त्यावर पडणारा तांबेरा रोग यामुळे पीक नेमके कोणते घ्यावे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. तांबेरा रोगामुळे या भागातील अनेक शेतांमधील उसाचे प्लॉट खराब होण्यास सुरुवात झाली आहे. तांबेरा रोगाचा आणखीन फैलाव होऊ नये, यासाठी नेमक्या काय उपाययोजना कराव्यात, या विवंचनेत शेतकरी आहेत.

कार्यशाळेचे आयोजन करावे

गिरणा परिसरातील बहुतांश ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी तसेच विविध विकास सोसायटी, बँकेकडून कर्ज घेतले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात कमालीची घट येणार असल्याने खर्चही निघेल की नाही, असे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. यावर्षी पाऊस चांगला न झाल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे. शेतकऱ्यांना ऊस, मका, कपाशी पिकांबाबत लवकरच र्मार्गदर्शन करून कार्यशाळा घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: Painting Theft Case : नाशिक कलानिकेतन चित्रचौर्याचा तीव्र निषेध

Web Title: Outbreak Of Tambera Disease On Sugarcane Scares Farmers Jalgaon Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..