Jalgaon Girish Mahajan : ‘रावेर’मध्ये भाजप गिरीश महाजनांचे हुकमी कार्ड वापरणे अशक्य

Girish Mahajan
Girish Mahajanesakal

"मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून राज्यातील मंत्र्यांना उमेदवारी दिली जाईल व त्यात रावेर लोकसभा मतदार संघातून गिरिश महाजन यांना तिकिट मिळेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. परंतु, रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपची मजबूत स्थिती पाहता महाजन यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची गरज नसल्याची स्थिती आहे." -कैलास शिंदे

जिल्ह्यात लोकसभेचे जळगाव आणि रावेर हे दोन मतदार संघ आहेत. गेल्या तीस वर्षांपासून हे दोन्ही मतदार संघ भाजपचे बालेकिल्ले आहेतच. या दोन्ही मतदार संघांत निवडणुकीचा तीस वर्षातील इतिहास पाहता विरोधी पक्षाचा उमेदवार कडवी लढत देऊ शकलेला नाही. गेल्या निवडणुकीत तर जळगांव लोकसभा मतदार संघात भाजपने तत्कालीन खासदार ए. टी. पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. (political article about raver constituency election and girish mahajan jalgaon news)

त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही ऐनवेळी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली गेली. त्यावेळी भाजपमध्ये नाराजी असल्याचे दिसत होते. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गुलाबराव देवकर उमेदवार होते. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. त्यांना प्रतिसादही चांगला मिळत असल्याने ऐनवेळी उमेदवारी मिळालेले उन्मेष पाटील यांचा पराभव होणार असेच वाटत होते. मात्र, प्रत्यक्ष निकालात उन्मेष पाटील हे लाखाच्या फरकाने निवडून आले. याचे कारण म्हणजे जिल्ह्यात भाजपचे केडर मजबूत आहे.

अगदी रावेर लोकसभा मतदार संघातही हीच स्थिती आहे. रावेर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे खासदार आहेत. श्री. खडसे भाजपमध्ये असताना त्यांची खानदेशात पक्षावर मजबूत पकड होती. त्यामुळे २०१४ मध्ये तत्कालीन विद्यमान खासदार दिवंगत हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी नाकारून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली.

त्या मोठ्या मताधिक्याने निवडूनही आल्या. त्यानंतर २०१९ मध्येही त्या दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्या पराभूत झाल्या. पुढे खडसे यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर, रक्षा खडसे या भाजपमध्येच राहिल्या. कोणत्याही राजकीय वादात न पडता त्यांनी पक्षात खासदार म्हणून काम सुरू ठेवले आहे.

Girish Mahajan
LokSabha Election: भाजप आमदारांना देणार खासदारकीचं तिकीट; राज्यातील 'या' मंत्र्यांची नाव चर्चेत

आजही त्या पक्षाचे काम करीत आहेत. त्यांचा जनसंपर्क सुरू आहे. सासरे राष्ट्रवादीत असले, तरीही त्यांनी कधीही भाजप विरोधात काम केल्याची एकही तक्रार नाही. शिवाय त्यांच्याबाबत पक्षातही नाराजी नाही. असे असतानाही आता केवळ सासरे राष्ट्रवादीत असल्याने त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार नाही, असे सांगितले जात आहे.

दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकाच घरात सासरे विरूद्ध सून अशी लढत न होता, भाजप एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मंत्री गिरीश महाजन यांना मैदानात उतरविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. श्री. महाजन हे पक्षाचे राज्यस्तरावरील नेते आहेत. आज ते सरकारचे आणि पक्षाचे संकटमोचक म्हटले जातात.

जळगाव जिल्ह्यात भाजप दोन्ही मतदार संघांत मजबूत आहे. सध्या तरी रावेर लोकसभा मतदार संघात पक्षाला धोका नाही. केवळ सासरे भाजपमध्ये आहेत, म्हणून पक्षाचा उमेदवार बदलायचा या व्यतिरिक्त दुसरे कारण नाही. मग अशा मजबूत स्थितीत पक्ष थेट महाजन यांच्यासारखा हुकमी पत्ता या ठिकाणी डावाला लावणार नाही. शिवाय रावेर लोकसभा मतदार संघ हा लेवा पाटीलबहुल मतदार संघ आहे.

या समाजाचेच एकमेव खासदार या मतदार संघातून निवडून जातात. त्यामुळे गेल्या अनेक निवडणुकीत भाजप व विरोधी काँग्रेस पक्षातर्फे लेवा पाटील समाजाचा उमेदवार दिला जातो. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मनीष जैन यांना उमेदवारी दिली होती.

Girish Mahajan
Maharashtra Politics: CM शिंदे-फडणवीस-पवार यांच्या रात्रीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती आली समोर

मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. अर्थात्‌ त्यामागे आघाडी अंतर्गत करणेही होती. पण, भाजप लेवा पाटील समाजाला नाराज करणार नाही. कारण त्याचा परिणाम विधानसभेवर होईल, याची जाणही पक्षाच्या नेतृत्वाला आहे.

या मतदार संघात विधानसभेचे जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, यावल व चोपडा हे मतदार संघ येतात. रावेर, यावल मतदार संघात काँग्रेसचा आमदार वगळता, जामनेर, भुसावळ मतदार संघात भाजपचे, तर मुक्ताईनगर, चोपडा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे आज तरी येथे भाजपची ताकद मोठी असून, भाजपने पुन्हा रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्यास त्याचा पराभव होईल, अशी स्थिती नाही.

त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. तरीही भाजपला उमेदवार बदलायचा असलाच, तर माजी दिवंगत खासदार हरिभाऊ जावळे यांचे पूत्र अमोल जावळे यांना पक्षाने रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष पद दिले आहे. त्यांचीही तयारी सुरू आहे आणि गिरीश महाजन हे पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या मागे आपली ताकद लावून त्यांना निवडून आणू शकतात.

शिवाय खानदेशातील चार लोकसभा जागांसाठी पक्षाला त्यांचा फायदा होवू शकतो. त्यामूळे गरज नसताना पक्ष त्यांना उमेदवारी देवून मतदार संघात अडकविण्याचा निर्णय घेणार नाही, असे सध्या तरी दिसत आहे. अर्थात्‌ महाजन यांनीही पक्षात आपल्या लोकसभा उमेदवारीची चर्चा नसल्याचे सांगितलेच आहे. मात्र राजकारणात ‘फुल स्टॉप’ कधीच नसतो, हे मात्र नक्की.

Girish Mahajan
Girish Mahajan News : जिल्हा दुध संघ पहिल्या पाचमध्ये आणायचाय..! : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com