Election News : एरंडोल पारोळा मतदारसंघात आमदारकीसाठी मोर्चेबांधणी; लोकसभेआधी विधानसभा निवडणुकीचीच पूर्वतयारी

Election
Electionesakal

Election News : देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात मात्र आमदारकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी वेगाने सुरू असून, विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी असताना इच्छूक उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेचे नियोजन करीत आहेत.

विधानसभेची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे लढविणार की स्वतंत्र लढविणार, याकडे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक केवळ सहा महिन्यांवर आली असल्यामुळे महायुतीमधील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी मतदारसंघात संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

तर महाविकास आघाडीमध्ये मात्र शांतता दिसत आहे. एरंडोल विधानसभा मतदारसंघात लोकसभेऐवजी विधानसभा निवडणुकीचीच पूर्वतयारी इच्छूक उमेदवारांकडून केली जात आहे. (Preparations for assembly elections before Lok Sabha in erandol jalgaon news)

राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाहोण्याची राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. एरंडोल विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी सर्वच पक्षात इच्छूक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) तसेच महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या सर्व पक्षांमध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांची संख्या लक्षात घेता मतदारसंघ सोडताना तसेच उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

सत्तारूढ महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातर्फे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसोबत एकनिष्ठ राहून मतदार संघातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.

शिवसेनेत ज्येष्ठ असताना पक्षाने त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानंतर देखील त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून मुख्यमंत्री शिंदे यांना खंबीरपणे साथ दिली असल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. महायुतीतील दुसरा घटकपक्ष असलेल्या भाजपकडून देखील पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी मतदारसंघात संपर्क साधण्यास सुरुवात करून विधानसभेसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Election
Loksabha Election : भाजप-धजद युतीबाबत कोणीही उघड वक्तव्य करू नका; दिल्लीतून हायकमांडचा नेत्यांना स्पष्ट इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातर्फे यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील हे देखील निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. महायुतीतील तीनही घटक पक्षातील निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या तीनही उमेदवारांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणूक महायुतीतर्फे एकत्रितपणे लढवली जाणार की तीनही पक्ष स्वतंत्रपणे लढविणार याकडे सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांमध्ये देखील निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त आहे. यामध्ये शिवसेनेमध्ये (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख डॉ. हर्शलमाने, एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन, माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील इच्छूक आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (शरद पवार गट) माजीमंत्री डॉ. सतीश पाटील आणि कॉंग्रेसतर्फे प्रदेश प्रातिनिधी विजय महाजन इच्छूक आहेत. विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी देखील दोन गटात विभागले गेले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देखील पदाधिकारी दोन गटात विभागले गेले आहेत. भाजप एकसंघ असला तरी पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले तीव्र स्वरूपाचे मतभेत पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. तर मतदारसंघात कॉंग्रेसचे अस्तित्व नगण्य स्वरूपात आहे.

Election
Assembly Elections : राजस्थान विधानसभेसाठी शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात?, केली 'ही' तयारी

पारंपरिक लढतीचीच राजकीय वर्तुळात चर्चा

विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभेची निवडणूक होणार असली तरी मतदारसंघात केवळ विधानसभेची चर्चा सुरू असून, इच्छूक उमेदवारदेखील त्यादृष्टीने नियोजन करीत आहेत. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील तयारी सुरू केली असून, मतदारसंघात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे प्रयत्न झाल्यास अन्य इच्छूक उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी यांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यास मतदारसंघ कोणत्या पक्षास सोडावा आणि उमेदवारी कोणाला द्यावी, असा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर उभा राहणार आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील अथवा त्यांचे पुत्र अमोल पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजीमंत्री डॉ. सतीश पाटील या पारंपरिक विरोधकांसह अपक्ष उमेदवारांमध्येच निवडणूक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराने सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

Election
Jalgaon News : समाजात जगणं झालं कठीण अन्‌ मरण स्वस्त; शहर, जिल्ह्यात तीन आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com