
Jalgaon Rain News : तीन आठवड्यांपासून गायब झालेल्या पावसाने शुकवारी जळगाव शहरासह जिल्ह्यात तुरळक स्वरूपात हजेरी लावली. आज दिवसभरात दोनदा-तीनदा पावसाची रिपरिप झाली.
शहरासह जिल्ह्यात पावसाच्या पुनरागमनाने करपलेल्या पिकांना जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, त्यासाठी हा पाऊस पुरेसा नसून दमदार पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. (Rains return after almost 3 weeks jalgaon news)
जून कोरडा गेल्यानंतर जळगाव जिल्ह्यात जुलैत काही प्रमाणात पाऊस बरसला. जिल्ह्याच्या पूर्व भागात रावेर, मुक्ताईनगर, यावल तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी जिल्ह्याचा पश्चिम, उत्तर व दक्षिण भाग कोरडाच राहिला. तरीही पिकांना दिलासा मिळेल असा पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यात ९५ टक्क्यांहून अधिक पेरण्या जुलैअखेर आटोपल्या होत्या. त्यानंतर जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारली.
ढगांची गर्दी, पावसाची हुलकावणी
या तीन आठवड्यांत दररोज आकाशात ढगांची गर्दी व्हायची; पण पाऊस पडेल असे वाटत असतानाच तो हुलकावणी देऊन गायब व्हायचा. या स्थितीमुळे जळगाव जिल्ह्यातील पिके धोक्यात आली आहेत. दोन- तीन लघुप्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांमध्ये अल्प पाणीसाठा, तर काही प्रकल्प कोरडीठाक आहेत. तापी नदी वगळता जिल्ह्यातील अन्य कोणतीही नदी वाहिली नाही. त्यामुळे पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तीन आठवड्यांनी आगमन
अखेर तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी (ता. १८) जळगावात पावसाचे पुनरागमन झाले. शुक्रवारी पहाटे शहरात पावसाचा शिडकावा झाला. मात्र, दुपारनंतर ढगांनी गर्दी केली व जोरदार पाऊस येईल, अशी स्थिती निर्माण झाली.
प्रत्यक्षात दुपारी तीननंतर तुरळक पावसाला सुरवात झाली. सायंकाळी सातपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. जळगाव जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाला. मात्र, हा पाऊस पुरेसा नसून या पावसाने पिकांना जीवदान मिळण्याचीही शक्यता नाही. त्यासाठी आणखी दमदार पाऊस अपेक्षित आहे.
"जळगाव जिल्ह्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. शेतांमधून वाहून निघेल असा पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. आता तर तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्याने झाल्या त्या पेरण्या व थोडीफार उगवलेली पिके करपली आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरवून पिके नष्ट केलीत. दोन-चार दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पेरण्या शंभर टक्के वाया जातील." - समाधान चौधरी, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.