Latest Marathi News | चालत्या रुग्णवाहिकेच्या दाराला चक्क दोरीचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rope Support of Ambulance Door

Jalgaon : चालत्या रुग्णवाहिकेच्या दाराला चक्क दोरीचा आधार

तळोदा : रुग्णवाहिका ही रुग्णांची ने- आण करीत त्यांचा जीव वाचविण्यासाठी उपयोगी पडत असते. मात्र तळोदा-नंदुरबार रस्त्यावर आज (ता. १४) रुग्णांना व त्यांचा नातेवाइकांना घेऊन जाणारी रुग्णवाहिकेची अगदी उलट परिस्थिती दिसून आली. या रुग्णवाहिकेच्या कडीकोयंडा तुटलेला असल्याने दाराला लावण्यासाठी चक्क दोरीचा वापर केलेला होता. त्यामुळे ही रुग्णवाहिका रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी चालली होती की रुग्ण व रुग्णाच्या नातेवाइकांच्या जिवाशी खेळ करीत होती, असा प्रश्न या रुग्णवाहिकेला बघून निर्माण होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यसेवा ही नेहमीच अलर्ट मोडवर ठेवावी लागते. कारण जिल्ह्याचा दुर्गम भागात आजही कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू यांचे प्रमाण अधिक असून ते कधी-कधी उजेडात येत असते तसेच उपलब्ध आरोग्यसुविधा देखील तोडक्या आहेत व भौगोलिक परिस्थिती देखील विपरीत आहे.(Rope support for Door of Ambulance Jalgaon News)

हेही वाचा: Agriculture Innovation : पिकांवरील फवारणीसाठी कृषी महाड्रोन ठरतोय वरदान

दरम्यान जिल्ह्यात फक्त नंदुरबार शहरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर अथवा सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे धडगाव, अक्कलकुवा, तळोदा तालुक्याचा दुर्गम भागातील रुग्णांना, इतकेच काय तर तालुक्याचा ठिकाणाच्या गंभीर रुग्णांना देखील नंदुरबार या जिल्ह्याचा ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. त्यासाठी रुग्णवाहिका या फार महत्त्वपूर्ण असून त्या नेहमी तत्पर ठेवाव्या लागतात.

तसेच एकंदरीत भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता रुग्णवाहिका या नेहमी सुस्थितीत असणे आवश्यक असल्याचे बोलले जाते.मात्र याचा अगदी उलट अनुभव शुक्रवारी (ता. १४) दुपारी तळोदा -नंदुरबार रस्त्यावर रुग्णाला घेऊन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला पाहिल्यावर आला. त्यामुळे सदर रुग्णवाहिका (क्रमांक : एमएच १४ सीएल ०७७२) ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या रुग्णवाहिकेची अवस्था जेमतेम होती, रुग्णवाहिकेचा मागच्या दरवाज्याच्या कडीकोयंडा तुटलेला दिसून येत होता, त्यामुळे रुग्णवाहिकेचे दार लावण्यासाठी दाराला चक्क दोरीने बांधलेले दिसून आले.

हेही वाचा: Jalgaon Crime Update : हॉटेल्स चोरट्यांचे लक्ष्य

सध्या तळोदा -नंदुरबार रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे, त्यामुळे या रस्त्यावर चालणाऱ्या चांगल्या स्थितीतील वाहने देखील खिळखिळे होतात. त्यात दाराला दोरीने बांधलेल्या अवस्थेतील या रुग्णवाहिकेची दोरी तुटून कधीही दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान रुग्णांना सेवा देणारी ही रुग्णवाहिका नेमकी कोणत्या रुग्णालयाची आहे. हे जरी माहीत नसले तर या अवस्थेत ती रुग्णवाहिका रुग्णांचा जीव वाचविण्याऐवजी रुग्णांचा व त्यांचा नातेवाइकांच्या जिवाशी खेळत तर आहे ना, अशी प्रतिक्रिया ही रुग्णवाहिका बघितल्यावर नागरिकांमधून उमटत होत्या.

तळोदा, धडगाव, अक्कलकुवा या तालुक्याच्या दुर्गम भागातील एकंदरीत भौगोलिक परिस्थिती व उपलब्ध आरोग्यसेवा लक्षात घेता, या परिसरात रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका या नेहमी सुस्थितीत व अद्ययावत सुविधांयुक्त असणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Indian Culture : भारतीय कला संस्कृतीचे दर्शन साता समुद्रापार

टॅग्स :Jalgaonambulance