Latest Jalgaon News | यावल अभयारण्यात आढळला ‘Slaty Legged Crake’; मध्य भारतातील पहिली नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Slaty Legged Crake

Jalgaon News : यावल अभयारण्यात आढळला ‘Slaty Legged Crake’; मध्य भारतातील पहिली नोंद

जळगाव : यावल अभयारण्यात स्थानिक, स्थलांतरित पक्षांच्या सुमारे ३५० प्रजाती आढळतात. अभयारण्यात हिवाळी, उन्हाळी स्थलांतरित पक्षांच्या अनेक प्रजाती अधिवास करताना दिसून येतात. उत्तरेकडील शीतप्रदेशातून दक्षिणेकडील उबदार प्रदेशांकडे स्थलांतर करणाऱ्या पक्षांसाठी अभयारण्य सुरक्षित संचारमार्ग प्रदान करते. यंदा ‘स्लेटी-लेग्ड क्रेक’ हा पक्षी प्रथमच संशोधनात आढळला आहे. मध्य भारतातील पहिली नोंद वन्यजीव सरंक्षण संस्थेच्या राहुल, प्रसाद सोनवणे यांनी हे संशोधन केले आहे. (Slaty Legged Crake found in Yaval Sanctuary Latest Jalgaon News)

संशोधनात ‘स्लेटी-लेग्ड क्रेक’ या रैलीडी कुळातील रहिवासी व स्थानिक स्थलांतरित पक्षाची नोंद केली आहे. या प्रजातीची ही नोंद मध्य भारतातील पहिलीच छायाचित्रित नोंद आहे. त्यांची या पक्षासंबंधीची रिसर्चनोट प्रख्यात ‘इंडियन बर्ड्स’ विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झाली आहे.

यावल अभयारण्यात पांढऱ्या डोक्याचा भारिट, रानपरिट, टायटलरचा पर्णवटवट्या, कडा पंकोळी, ब्लू- कैप्ड रॉक थ्रश, टिकेल्सचा कस्तुर, राखी रानभिंगरी, नवरंग, विविध ककुज स्थलांतरित पक्षी चांगल्या संख्येत आढळतात. स्लेटी-लेग्ड क्रेक (मातकट पायाची फटाकडी)चे पाय हिरवट राखाडी असून, बोटे लांबसडक असतात. याची वरील बाजू गडद तपकिरी, पोटाकडील बाजूवर पांढरे व काळे पट्टे असतात. चोच हिरवी व डोळे लाल असतात. शेपटी आखूड असते. हे पक्षी घनदाट जंगलातील पाणथळ जागी आढळतात. हे सायंकाळी अन्नाच्या शोधात बाहेर पडतात.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

हेही वाचा: SAKAL Impact : विविध अधिकारी काकडमाळच्या दारी!; पात्र लाभार्थ्यांना जागीच शिधापत्रिकांचे वाटप

यावल अभयारण्यात स्थलांतरित व स्थानिक पक्षांच्या सुमारे ३५० प्रजाती आढळतात. त्यात दुर्मिळ घुबडे, गरुड, कस्तूर, सुतार, तांबट, पाणपक्षी, वटवटे आदींचा समावेश आहे. त्यामुळे अभयारण्य अतिमहत्त्वाचे पक्षी अधिवास क्षेत्र घोषित होण्यास पात्र आहे. मात्र, वाढते अतिक्रमण, जंगलतोड, अपुरे मनुष्यबळामुळे जळगाव जिल्ह्यातील पक्षांचा हा समृद्ध अधिवास धोक्यात येत आहे. अतिक्रमणे, जंगलतोड वाढत राहिल्यास स्थलांतरित पक्षांचा हक्काचा अधिवास व संचारमार्ग खंडित होण्याची शक्यता आहे. यासाठी अभयारण्याच्या सुरक्षेसाठी पुरेशा मनुष्यबळासहित इतर संवर्धन प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे यांनी सांगितले.

"स्लेटी-लेग्ड क्रेकची यावल अभयारण्यातील ही नोंद संपूर्ण मध्य-भारतातील, तसेच महाराष्ट्रातील पश्चिम घाटाबाहेरील पहिलीच नोंद आहे. यामुळे या एकांतवासी, गुप्त जीवन जगणाऱ्या, सायंचर व आंशिक निशाचर पक्षाची आणखी आढळस्थाने व त्यांचा स्थलांतर मार्ग शोधण्यास मदत मिळू शकते. अभयारण्यातून नवनवीन पक्षांची नोंद होणे तेथील पक्षी विविधतेच्या संपन्नतेचे प्रतीक आहे." -प्रसाद सोनवणे, पक्षी अभ्यासक

हेही वाचा: Nashik News: सर्वसाधारण सभापतीपदामुळे राजकारण रंगणार!; महिलांसाठी सोडतीव्दारे 10 सभापतीपदे आरक्षित

टॅग्स :Jalgaonbird