Latest Marathi News : ‘अमृत 2.0’ प्रस्तावाच्या मक्त्यावर तीन तास चर्चा, तरीही विषय तहकूब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon : ‘अमृत 2.0’ प्रस्तावाच्या मक्त्यावर तीन तास चर्चा,तरीही विषय तहकूब

जळगाव : ‘दुधाने तोंड पोळल्यास, ताकही फुंकून पिले जाते’ अशी म्हण प्रचलित आहे. त्याचाच अनुभव शुक्रवारी (ता. २१) महापालिकेच्या महासभेत आला. घरकुलाच्या मंजुरीच्या प्रस्तावामुळे अनेकांना फौजदारी कारवाईचा फटका बसला.

तोच अनुभव आपल्याला नको, म्हणत ‘अमृत २.०’चा प्रस्ताव शासनाला साद करण्यासाठी मक्तेदार नियुक्तीवरून तब्बल तीन तास चर्चा झाली. अखेर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने हा विषय तहकूब ठेवण्यात आला. उर्वरित दहा विषय मात्र अवघ्या अर्ध्या सेकंदात मंजूर करण्यात आला.

महपालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आज महासभा झाली. महापौर जयश्री महाजन अध्यक्षस्थानी होत्या. उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे व्यासपीठावर होते.(Three hours of discussion on Amrit 2.0 proposal still subject adjourned Jalgaon News)

हेही वाचा: Diwali Festival : आजपासून दीपोत्सव प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी जळगावकर सज्ज!

पहिल्याच विषयावर तीन चर्चा
शहरात ‘अमृत २.०’ योजना राबविण्यासाठी शासनाकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. महापालिकेतर्फे प्रस्ताव तयार करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील मक्तेदार निसर्ग संस्था यांना काम देण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठीही त्यांनाच मक्ता देण्यात आला आहे. या संस्थेने काही काम पूर्ण केले आहे. मात्र हा मक्तेदार रद्द करून जीवन प्राधिकरणाकडून नवीन प्रस्ताव तयार देण्याचा निर्णय घेण्यात येत होता. मात्र असा निर्णय झाल्यास जुना मक्तेदार न्यायालयात जाऊन आर्थिक मागणी करू शकतो त्यामुळे त्याची जबाबदारी ‘घरकुल’ प्रकरणाप्रमाणेच पालिकेच्या नगरसेवकांवर येण्याची शक्यता असल्याने अनेकांनी या प्रस्तावाला विरोध केला. सत्ताधारी गटातर्फे नितीन लढ्ढा, विरोक्षी पक्षनेते सुनील महाजन यांनीही हा प्रस्ताव मंजूर नसल्याचे स्पष्ट केले, तर भाजपतर्फे प्रस्तावावर हरकत घेण्यात आली, तसेच नवीन प्रस्ताव पाठविण्याची मागणी करण्यात आली. तब्बल तीन तास चर्चा सुरू होती.
विषय तहकुबीचा ठराव
तीन तास चर्चा होऊनही ठराव मंजूर केल्यास घरकुलप्रमाणे कारवाईची होण्याची भीती नगरसेवकांमध्ये कायम होती. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गटागटाने चर्चा केली. त्याच्या परिणामाची माहिती घेतली. मात्र त्यानंतरही ठराव मंजूर केल्यावर कारवाई टळणारच नाही या भीतीने अखेर विषय मंजुरीचा प्रस्ताव देऊन ठराव मंजूर करण्यात आला. भाजपचे नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांनी प्रस्तावाचा विषय तहकूब करावा, असे मत मांडले. त्याला सत्ताधरी व विरोधी नगरसेवकांनी मंजुरी दिली आणि एकमताने हा विषय तहकूब करण्यात आला. त्यानंतर विषयपत्रिकेवरील दहा विषय अवघ्या अर्ध्या सेकंदात मंजूर करण्यात आले.

हेही वाचा: Jalgaon : वॉटरग्रेस म्हणते दिवाळी आली कचरा वाढला; नगरसेवक म्हणतात वॉटरग्रेसला हाकलाच!

महापौर व्यासपीठावरून खाली बसले!
‘अमृत २.०’ योजना शहरात राबविण्यासाठी शासनाला सादर
करण्यात येणाऱ्या अहवालाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मक्तेदार नियुक्तीच्या विषयावर चर्चा करण्यात येत होती. हा प्रश्‍न आर्थिक व्यवहाराचा असल्याने या विषयाबाबत आपण उपमहापौर म्हणून व्यासपीठावर चर्चा न करता नगरसेवक म्हणून आपले मत मांडणार आहोत, त्यासाठी आपण नगरसेवकांत बसतो, असे सांगून ते व्यासपीठावरून खाली आले व सत्ताधारी नगरसेवकांच्या सोबत बसून आपली भूमिका मांडली.
आमदार भोळेंना भ्रमणध्वनी
प्रस्तावाच्या मंजुरीबाबत सत्ताधारी व विरोधी गटाचा अंतिम निर्णय होत नव्हता, आमदार भोळे यांनी गुरुवारी (ता. २०) बैठक घेऊन अमृत-२.० चा प्रस्ताव तयार करून तातडीने शासनाकडे पाठवावा, असे कळविले होते. मात्र सभेत त्यावर सर्व नगरसेवकांचे एकमत होत नव्हते. त्यामुळे हा प्रस्ताव तहकूब करण्यावर चर्चा करण्यात आली. त्या वेळी आमदार भोळेंना याबाबत विचारणा करावी असे ठरले. त्यानुसार भाजपचे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी त्यांना भ्रमणध्वनी करून चर्चा केली. त्यानंतर सभा तहकूब करण्यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: Diwali MSRTC Fare Hike : दिवाळीत STला भाडेवाढीचा चटका!