
Yuvarang 2023: धम्माल कलाविष्काराने जिंकली श्रोत्यांची मने; 3 दिवसांत ‘एकसे बढकर एक..’ कलाप्रकार सादर
फैजपूर (जि. जळगाव) : येथे सुरू असलेल्या युवारंग युवक महोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातून १०४ महाविद्यालयांतील दीड हजार विद्यार्थी, कलावंतांचे समूह प्रमुख, प्राध्यापक, सहकलावंत यांनी तीन दिवस कलाविष्कार सादर करून आपली कला पणाला लावली.
या महोत्सवाचे पारितोषिक वितरण होणार असल्याने सर्वच स्पर्धकांना उत्सुकता लागली आहे. ‘कौन मारेगा बाजी..’ या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.‘युवारंग’मध्ये तीन दिवस ‘एकसे बढकर एक..’ असे सादरीकरण विद्यार्थी कलावंतांनी सादर केले. सर्व स्पर्धांना श्रोत्यांची भरभरून साद मिळाली. (Yuvarang 2023 amazing performance wins hearts of audience jalgaon news)
(कै.) सुनीतभाई धनजी बोंडे रंगमंचावर विडंबन व प्रहसन नाटक झाली. यात एकूण २९ स्पर्धकांनी समूह सहभाग नोंदवला. तसेच दुसऱ्या दिवशी मिमिक्री कलाप्रकार सादर करण्यात आला. मूकनाट्य व नक्कल हे कलाप्रकर सादर केले.
यात एकूण १२ संघांनी सहभाग घेतला. भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आली. यात पारंपरिक नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले. यात सामाजिक, धार्मिक, पारंपरिक स्पर्धकांनी नृत्य सादर केली. यातून भारतीय पारंपरिक, संस्कृतीचे दर्शन नृत्य कलाविष्कारातून खऱ्या अर्थाने झाले.
उच्चकोटीचे शास्त्रीय संगीत
कै. व्ही. डी. फिरके रंगमंचावर भारतीय समूहगान कला प्रकार सादर करण्यात आला. यात २३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी पाश्चिमात्य गायन स्पर्धेत ११ स्पर्धकांनी तर शेवटच्या तिसऱ्या दिवशी भारतीय शास्त्रीय नृत्य व भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद हे कला प्रकार सादर करण्यात आले. शास्त्रीय नृत्यात १० व शास्त्रीय नृत्य कलाप्रकारात ६ स्पर्धक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

वक्तृत्व कलेला वाव
(कै.) घनश्याम काशिराम पाटील रंगमंचावर वक्तृत्व स्पर्धेत 'समाज आणि माध्यमे' सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाजू मांडल्या. यात ७७ स्पर्धकांनी भाग घेतला. यानंतर दुसऱ्या दिवशी वादविवाद स्पर्धेत ६१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. तिसऱ्या दिवशी स्थळ चित्र आणि स्थळ चित्राची अंतिमफेरी सादर करण्यात आली.
ताल-सुराचा मिलाफ
कै. वजीर चांदखा तडवी रंगमंचावर स्वर व तालवाद्य कलाप्रकार सादर झाले. यात नऊ समूह स्पर्धक व ताल वाद्यासाठी १२ समूह स्पर्धक असे २१ समूह सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी सुगमसंगीत स्पर्धेत ३१ स्पर्धक सहभागी झाले होते. तिसऱ्या दिवशी नाट्य संगीतात ९ व मेहंदी कलाप्रकारात ५९ स्पर्धक सहभागी झाले होते.
रांगोळीने वेधले लक्ष
कै. बाजीराव नाना पाटील रंगमंचावर स्थळ चित्रकला प्रकारात ४२ स्पर्धक, व्यंगचित्र कला प्रकारासाठी ३८ स्पर्धक, चिकटकला कला प्रकारासाठी ३५ व मातीकला स्पर्धेसाठी ३२ तसेच इन्स्टॉलेशनसाठी ४० स्पर्धक सहभागी झाले होते. शेवटच्या तिसऱ्या दिवशी पोस्टर मेकिंगसाठी ४७ व रांगोळीसाठी ६० सहभागी झाले होते.
पारितोषिक वितरणाने आज समारोप
जल्लोषात प्रारंभ झालेल्या ‘युवारंग’चा समारोप सोमवारी (ता. १३) पारितोषिक वितरणाने होणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्र. कुलगुरू प्रा. डॉ. सोपान तुकाराम इंगळे हे राहणार आहे.
तर सिनेनाट्य कलावंत गौरव मोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. या वेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.