तिच्यासाठी त्यांनी जमवले लाखांकडून एक..एक..

विजय सपकाळ
Monday, 9 December 2019

तेजस्विनी मोने ऊर्फ श्रद्धा ही लाघवी, हसरं खेळत व्यक्तिमत्त्व असलेली विद्यार्थिनी शाळेत आल्यानंतर डोक दुखतंय म्हणायची. तिला शिकवणारे वर्गशिक्षक अण्णासाहेब दिघे गुरुजींच्या ध्यानात ही बाब आली. सातत्याने असं घडत असल्याने शिक्षकांनी पालकांना शाळेत बोलावून ही बाब त्यांच्या ध्यानात आणून दिली.

मेढा (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यातील शिक्षकांनी शैक्षणिक कामकाजाबरोबर आपली सामाजिक बांधिलकीदेखील नेहमी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षकांनी पुढाकार घेतला आणि सोशल मीडियाच्या चमत्काराने तब्बल चार लाख जमा झाले अन्‌ गरीब सर्वसामान्य एका चिमुकल्या विद्यार्थिनीला जीवदान मिळाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई - सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
याचा प्रत्यय नुकताच ओझरे प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या तिसरीतील विद्यार्थिनीच्याबाबतीत दिसून आला. शिक्षकांनी तिच्या मेंदूतील अवघड शस्त्रक्रियसाठी जवळपास चार लाखांची मदत गोळा करून तेजस्विनीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेज आणण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षकांनी जपलेल्या या सामाजिक बांधिलकीची संपूर्ण तालुक्‍यात विशेष कौतुक होत आहे.
अवश्य वाचा - आता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत : शशिकांत शिंदे 

शाळेत तिसरीत शिक्षण घेणारी तेजस्विनी मोने ऊर्फ श्रद्धा ही लाघवी, हसरं खेळत व्यक्तिमत्त्व असलेली विद्यार्थिनी शाळेत आल्यानंतर डोक दुखतंय म्हणायची. तिला शिकवणारे वर्गशिक्षक अण्णासाहेब दिघे गुरुजींच्या ध्यानात ही बाब आली. सातत्याने असं घडत असल्यामुळे या शिक्षकांनी पालकांना शाळेत बोलावून ही बाब त्यांच्या ध्यानात आणून दिली व त्यांना मेंदूचा सिटी स्कॅन करून घेण्याचा सल्ला दिला. पालकांनी तातडीने एमआरआय केले असता तेजस्विनीच्या डोक्‍यात मेंदूला चार गाठी असल्याचे समोर आले, तर यासाठी चार लाख अपेक्षित खर्च सांगण्यात आला. आर्थिक परिस्थिती तितकी खर्च करण्याची नसल्यामुळे आईने बिछाना धरला, वडीलदेखील हतबल झाले.

जरुर वाचा - पोलिस झाडावर लपून बसतात तेव्हां...  

अशा स्थितीत शाळेचे मुख्याध्यापक विजय धनावडे, उपक्रमशील शिक्षक बळवंत पाडळे, वर्गशिक्षक दिघे, सुवर्णा मदने, नेहा जाधव या शिक्षकांनी स्वतःकडील मदत तर केलीच; पण ग्रामस्थांसह सामाजिक सेवा संस्थांना तेजस्विनीच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही घटना सर्वदूर पोचली. बघता- बघता मोठी मदत जमा झाली. तेजस्विनीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आज नऊ वर्षांची तेजस्विनी ओझरे शाळेत पूर्वीप्रमाणे ज्ञानार्जन करत आहे. हे केवळ शाळेतील शिक्षकांनी दाखवलेली तत्परता, सजगता आणि सोशल मीडियांच्या चमत्कारातून 
शक्‍य झाले. 

...अन्‌ तेजस्विनीच्या चेहऱ्यावर फुलले तेज 

ओझरे शाळेतील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी दाखवल्याने मोने कुटुंबीयांना तेजस्विनीच्या उपचारासाठी मोठा मानसिक व आर्थिक आधार मिळाला. गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या राजेंद्र मोने यांनी तर मुलीच्या उपचारासाठी काय करावे याचा विचार करून डोक्‍याला हातच लावला होता; पण अशा कठीण समयी तिचे शिक्षकच देवदूतासारखे धावून आले.

तेजस्विनीवरील मेंदूवरील शत्रक्रिया यशस्वी होऊन आज नऊ वर्षांच्या निरागस तेजस्विनीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेज येऊन तिचा चेहरा हास्याने फुलला आहे. शिक्षकांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी मोने कुटुंबीय कधीच विसरू शकणार नाहीत. 

हेही वाचा - एसपीं मुळेच आम्ही करुन दाखवलं : पाेलिसांची भावना 

""एकाचे लाख मिळतील; पण लाखांकडून एक एक करून लाख मिळावेत म्हणून मायेचा हा कटोरा आपल्यापुढे करतोय. एका लेकीसाठी... धर्मकन्येसाठी... अशा सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला साद मिळाली. सोशल मीडियाचा चमत्कार झाला अन्‌ रक्कम जमा झाली. आमच्या विद्यार्थिनीला जीवदान मिळाले.'' 

- बळवंत पाडळे, आदर्श शिक्षक, ओझरे प्राथमिक शाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Media Helped Teachers to Collect Fund For Student Brain Operation