पोलिसांच्या सतर्कतेमुळे वृद्धेस गवसले घर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

बोरगाव पोलिसांनी अगदी चिकाटीने साबळे कुटुंबीयांशी संपर्क साधला. अखेरपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत. त्यांचे विशेष कौतुक वाटते. त्यामुळेच आजींना त्यांचे घर गवसले.

नागठाणे (जि. सातारा) : बोरगाव पोलिस ठाण्यातील कर्मचारी अन्‌ पत्रकार यांच्या सतर्कतेमुळे कुटुंबीयांपासून दुरावलेल्या वृद्धेला अखेर स्वतःचे घर गवसले. यामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.  

लीलाबाई नारायण साबळे (वय 75, मूळ. रा. चाहूर, ता.जावळी, हल्ली रा. कोडोली, ता.सातारा) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बोरगाव पोलिस ठाण्याच्या आवारात त्या आल्या. या वेळी आवारात उभ्या असलेल्या महिला ठाणे अंमलदार सौ. कुदळे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. आपण घरापासून चुकल्याचे त्यांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी याची माहिती गुन्हे शाखेचे कर्मचारी राजू शिखरे यांना दिली. याचवेळी पोलिस ठाण्यात उपस्थित असलेले बातमीदार संभाजी चव्हाण यांनाही ही बाब समजली.

हेही वाचा - पानिपतचा होमकुंड जागता ठेवा : विश्वास पाटील 

पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, राजू शिखरे, महिला पोलिस मेघा बनसोडे तसेच संभाजी चव्हाण यांनी साबळे यांच्याकडून माहिती घेतली. आपले नाव लीलावती नारायण साबळे असल्याचे सांगितले. आपण मूळच्या जावळी तालुक्‍यातील चाहूरच्या असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्या गावाचे पुनर्वसन झाले आहे. मात्र, सध्या नेमक्‍या कोणत्या गावात आपण राहतो, हेच त्यांना सांगता येत नव्हते. त्यातच थंडीमुळे त्यांना नीट बोलताही येत नव्हते. काही महिलांसोबत आपण देवाला आलो आणि त्यांच्यापासून चुकलो एवढेच त्या सांगत होत्या. त्यांची अवस्था पाहून पोलिसांनी त्यांना चहा-बिस्किटे खायला देऊन उबेसाठी तेथे असलेला एक रग पांघरायला दिला.

नक्की वाचा -  पैलवान असाच घडत न्हाय..! 

तोपर्यंत त्यांच्याकडून मिळालेल्या त्रोटक माहितीवरून पोलिसांनी बोरगाव ठाण्याच्या हद्दीत पुनर्वसित असलेल्या जांभगाव, जांभळेवाडी, आष्टे, पाटेश्वरनगर आदी गावांमध्ये मोबाईलवरून संपर्क साधून गावात कोणी साबळे आडनावाचे कुटुंब आहेत का, याची चौकशी केली. 
मात्र, पदरी निराशाच आली. याच वेळी पुन्हा चौकशी केली असता त्यांनी मुलाचे नाव पांडुरंग नारायण साबळे असे सांगितले. तो न्यायालयात असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी पुन्हा न्यायालयात संपर्क साधला. अखेर पांडुरंग साबळे यांचा मोबाईल नंबर मिळाल्यावर पोलिसांनी त्यांना घटनेची कल्पना दिली.
 
दरम्यान, कोडोली येथे वास्तव्यास असलेल्या पांडुरंग साबळे यांच्या घरीही रात्री उशीर होऊनही आई आली नसल्याने शोधाशोध सुरू झाली होती. बोरगाव पोलिसांकडून त्या सुखरूप असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तत्काळ साबळे कुटुंब गाडी घेऊन बोरगाव पोलिस ठाण्यात आले. अखेर रात्री उशिरा घरापासून दुरावलेल्या लीलावती साबळे यांना पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. यावेळी साबळे कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले. 

जरुर वाचा -  सैन्य दलातील जवानांसाठी आपुलकीचा गाेडवा

"बोरगाव पोलिसांनी अगदी चिकाटीने साबळे कुटुंबीयांशी संपर्क साधला. अखेरपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत. त्यांचे विशेष कौतुक वाटते. त्यामुळेच आजींना त्यांचे घर गवसले.' 

चंद्रकांत माळी, सहायक पोलिस निरीक्षक, बोरगाव पोलिस ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due To Borgaon Police Station Old Age Women Met With Family