esakal | पाटण तालुक्यात भूस्खलनग्रस्तांच्या मदतीला धावली 'महाराष्ट्र बॅंक'
sakal

बोलून बातमी शोधा

Bank of Maharashtra

तीन दिवसांत झालेल्या प्रचंड पावसात तालुक्यात हाहाकार उडाला होता.

पाटण तालुक्यात भूस्खलनग्रस्तांच्या मदतीला धावली 'महाराष्ट्र बॅंक'

sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : पाटण तालुक्यात (Patan Taluka) अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) ठिकठिकाणी भूस्खलन होऊन घरे व माणसं गाडली गेली. यंदा भूस्खलन अनेक गावात आणि मोठ्या प्रमाणात झाल्याने दरडग्रस्त तालुका म्हणून पाटणची नवी ओळख निर्माण झाली. नुकसान झालेल्या कुटुंबांना शासन व प्रशासनाने अनेक घोषणा केल्या. त्यांना अजूनही निवारा शेड देखील करू शकले नाहीत, मात्र बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank of Maharashtra) वतीने कोणताही गाजावाजा न करता तालुक्यातील काही घरे उभी करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्यांची ही तत्पर सामाजिक बांधिलकी इतरांच्या तुलनेत उजवी ठरली आहे. यामुळे बाधित कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आहे.

तीन दिवसांत झालेल्या प्रचंड पावसात तालुक्यात हाहाकार उडाला होता. तालुक्यातील सर्वच विभागात भूस्खलनाच्या घटना घडून संसार उघड्यावर आले होते, तर मोरगिरी व कोयना विभागात जीवितहानी झाली होती. डोळ्यांदेखत घरे व जीव गाडले गेले. अतिशय हृदयद्रावक प्रसंगातून तालुका सावरत आहे. उघड्यावर आलेले संसार शासनाकडून उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, दीड महिन्यानंतरही यंत्रणा तात्पुरती निवारा शेड देखील उभारू शकली नाही हे वास्तव आहे. अशात बँक महाराष्ट्राच्या वतीने अतिशय योजनाबद्ध पद्धतीने काही कुटुंबे दत्तक घेऊन त्यांचा निवारा उभा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामध्ये तारळे भागातील जाधववाडी गावातील शामराव मारूती घाडगे यांच्या घराचा समावेश होता.

हेही वाचा: देशमुख, परबांनंतर तिसऱ्या 'अनिल'च्या शोधात पुण्यात

घाडगे यांचे घर अतिवृष्टीमुळे भुईसपाट झाले होते. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. यांच्या मदतीसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र धावून आली. स्थानिक अधिकाऱ्यांनी या घरांना भेट देऊन घरे उभे करण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी लागणारे साहित्य व खर्चाचा अहवाल वरिष्ठांना पाठवला होता. त्यानुसार वरिष्ठांनी त्यास मान्यता देऊन काम सुरू केले होते. आज यावस्तू उभ्या राहिल्या आहेत. उघड्यावर आलेल्या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवून देत बँक ऑफ महाराष्ट्राने आपली सामाजिक जबाबदारी अत्यंत चोख व तातडीने पार पाडली. याचे कौतुक आहे, तर बाधित कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. 

हेही वाचा: 'माझ्या नादाला लागू नका, नाहीतर पुढच्या वेळी डिपॉझिट पण ठेवणार नाही'

या कुटुंबांना व वास्तूच्या हस्तांतरण वेळी मुख्य कार्यालय पुणेचे जनरल मॅनेजर विजय कांबळे, झोनल मॅनेजर अपर्णा जोगळेकर, डेप्युटी झोनल मॅनेजर श्रीकृष्ण झेले, तारळे शाखेचे मॅनेजर सचिन फसाले यांनी आज भेट दिली. कुटुंबाला आधार देण्याचे काम पदाधिकारी यांनी कोणताही गाजावाजा न करता पूर्ण केले हे विशेष. घाडगे कुटुंबाने त्यांचे आभार मानले. कुटुंब प्रमुख अंथरुनावर असल्याने माउलीची कुटुंबासाठी धडपड पाहून पदाधिकारी सुध्दा भावूक झाले. त्यांची मदत नेमक्या गरजू कुटुंबापर्यंत पोहचल्याचा त्यांना सार्थ अभिमान वाटला. घाडगे कुटुंबीयांच्या बरोबरीने इतर काही कुटुंबांनाही निवारा देण्याचे काम बँकेने केले आहे.

loading image
go to top