"या' योजनेमुळे गावाचा झाला कायापालाट, वाचा...

प्रतिनिधी
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

जलसंधारणाच्या कामांमुळे आठ कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. भूजल पातळीत वाढ झाली. यामुळे दुष्काळग्रस्त गावाचा ठसा दूर झाल्याने पाणीदार गाव म्हणून गुंडेवाडीची ओळख निर्माण झाली आहे.

नांदेड  - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झाल्यानंतर गुंडेवाडी (ता. लोहा) गावशिवारात लोकसहभागातून जलसंधारणाचे विविध उपचार करण्यात आले. जलसंधारणाच्या कामांमुळे आठ कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. भूजल पातळीत वाढ झाली. यामुळे दुष्काळग्रस्त गावाचा ठसा दूर झाल्याने पाणीदार गाव म्हणून गुंडेवाडीची ओळख निर्माण झाली आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

लोहा तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या गुंडेवाडी गावातील ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गुंडेवाडी गावाची निवड झाली. टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट केली. गावशिवारात करावयाच्या जलसंधारणाच्या कामाचे विविध कामांचे नियोजन ग्रामसभामध्ये करण्यात आले.

श्रमदानासाठी गाव झाले एकत्र 
गुंडेवाडी गावाच्या शिवारातील माळावर खोल सलग समतल चर (डीप सीसीटी) खोदण्यात आले.त्यामध्ये १५ हजार घनमीटर पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली आहे. नाला खोलीकरणाच्या कामांमुळे १२ हजार घनमीटर, कंपार्टमेंट बंडिंगमुळे ५५ हजार घनमीटर पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली. पाच शेततळ्यांची कामे झाली आहेत. श्रमदानातून शेततळे खोदण्यात आले. श्रमदानातून करण्यात आलेल्या कंपार्टमेंट बंडिंगच्या कामांमध्ये ५ हजार घनमीटर पाणी साठवण होऊ शकते. शिवारात केलेल्या विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या कामांमुळे आठ कोटी लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी भूगर्भात मोठ्या प्रमाणावर मुरल्याने गावशिवारातील तलाव आणि विहिरींच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

येत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या'; ठिकाणी होणार पाऊस

वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गुंडेवाडीचा दुष्कळा हटला आहे. कधी काळी दुष्काळी गाव असलेल्या गुंडेवाडीची आता पाणीदार गाव म्हणून जिल्ह्यात ओळख निर्माण झाली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गावाला वेळोवेळी भेटी देऊन जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व आणि नियोजन कसे हे सांगितले. डोंगरे यांच्या प्रेरणेतून गुंडेवाडी गावातील युवकांसह ग्रामस्थांनी एकजुटीने जलसंधारणाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यामुळे गुंडेवाडी गावास वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. या कामांसाठी वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांचे मोलाचे सहकार्य लाभले. गुंडेवाडी ग्रामस्थाकडून नुकतेच जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजली अरुण डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी प्रभाकर मांजेवाड, उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस. आर. कुलकर्णी, गट शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased ground water level