5 वर्षांत 4 कॅन्सर, पण सर्वसामान्य आयुष्य जगतोय हा व्यक्ती

Health,cancer fight
Health,cancer fight

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक जणांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. योग्य खबरदारी आणि मानसिकता याच्या जोरावर गंभीर आजाराला थोपवणाऱ्यांच्या अनेक योद्ध्यांच्या कहाण्या संकटजन्य काळात तुम्ही ऐकल्या असतील. संघर्षमयी गोष्टीतून प्रत्येकालाच एक प्रोत्साहन मिळत असते. 63 वर्षांचे अशोक कांबळे यांची कहाणी देखील अशीच काहीशी आहे.  मागील 5 वर्षे ते 4 वेगवेगळ्या कॅन्सरशी लढा देत आहेत. 2016 मध्ये त्यांना पहिल्या कॅन्सरचं निदान झालं. आधी किडनी मग थायरॉइड आणि त्यानंतर  अन्ननलिका आणि प्रोस्टेट कॅन्सर. पण तरी ते खचले नाहीत. या कॅन्सरशी लढत आपलं आयुष्य सर्वसामान्यपणे जगत आहेत.

2016 मध्ये अशोक यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं. तेव्हापासून ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत. त्यांनी किडनी आणि थायरॉइड कॅन्सरवर मात केली. आता अन्ननलिका आणि प्रोस्टेट कॅन्सरवर उपचार सुरू आहेत. त्यांना चौथ्या टप्प्यातील प्रोस्टेट कॅन्सर आहे. तो नियंत्रणात असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.  

"कॅन्सरमुळे माझ्या उजव्या किडनीवर गंभीर परिणाम झाला. त्यामुळे 2016 मध्येच डॉक्टरांनी माझी उजवी किडनी काढली. तेव्हापासून मी एकाच किडनीवर जगतो आहे. 2017 मध्ये मला गंभीर स्वरूपाचा थायरॉइड कॅन्सर झाला. त्याच वर्षात डॉक्टरांनी मला पूर्ण थायरॉइड काढून टाकण्याचा सल्ला दिला. जेव्हा मला हे दोन्ही कॅन्सर झाले तेव्हा मी सरकारी नोकरी करत होतो." 2020 मध्ये अशोक यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया  करण्याचा सल्ला दिल्याचे  अशोक कांबळे यांनी सांगितले. 

"डॉक्टरांनी माझ्या अन्ननलिकेचा जवळपास तीन चतुर्थांश भाग काढून टाकला. मला मी नियमित जसा आहार घ्यायचो तसा मला घेता येत नाही. अन्ननलिकेची शस्त्रक्रिया झाल्याने मी नेहमीपेक्षा कमी खातो. मी जरी कमी खात असलो तरी घरी बनवलेलं ताजं अन्न खातो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहार घेतो. मला अधिक तीव्र अशा एक्सरसाईज करायला जमत नाहीत. पण मी दिवसभर स्वतःला ऍक्टीव्ह ठेवतो. शरीराची हालचाल होईल अशा सौम्य एक्सरसाईज करतो. थायरॉइड कॅन्सरवर उपचार सुरू असतानाच मला प्रोस्टेट कॅन्सर असल्याचं समजलं."

अशोक यांच्यावर उपचार करणारे रुबी हॉल क्लिनिकमधील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मिनीष जैन यांनी सांगितलं, "अशोक यांना किडनी आणि थायरॉइड असे दोन कॅन्सर झालेत. त्यांचा कॅन्सर शरीरातील इतर अवयवांतही पसरला. त्यांना मेटास्टेटिक कॅन्सर झाला. जेव्हा आम्ही बायोप्सी केली. तेव्हा त्यांना प्रोस्टेट कॅन्सरही असल्याचं समजलं.  जेव्हा जेव्हा आम्ही तपासणी केली तेव्हा त्यांना नवीन कॅन्सरचं निदान झालं"

डॉ. जैन पुढे म्हणाले, "जर अशोक यांना झालेले कॅन्सर नवीन आहेत हे आम्हाला समजलं नसतं आणि आम्ही आधीचा कॅन्सरच इतर अवयवात पसरला असावा असं समजून उपचार करत राहिलो असतो तर उपचार प्रभावी ठरले नसते" अशोक यांना प्रोस्टेट कॅन्सरवर उपचारासाठी आवश्यक औषधं दिली जात आहेत.

डॉ. जैन म्हणाले, "आता त्यांना चौथ्या टप्प्यातील कॅन्सर असला तरी काळजी करण्यासारखं काही नाही. जर तज्ज्ञांनी कॅन्सरच्या योग्य प्रकाराचं निदान केलं आणि त्यावर योग्य उपचार केले तर रुग्ण निरोगी आयुष्य जगू शकतो. अशोक यांचा कॅन्सर आता नियंत्रणात आहे. त्यांना आम्ही योग्य ती औषधं देतो. ते एकदम व्यवस्थित आहेत."

"एखाद्या रुग्णाला असे 4 कॅन्सर होणं हे दुर्मिळ आहे आणि 4 कॅन्सर होऊनही अशोक यांनी दृढपणे लढा दिला. ते निरोगी आयुष्य जगत आहेत, त्यांचा दिनक्रम सुरळीत सुरू आहे. हे खूप कौतुकास्पद आहे", असं डॉ. जैन यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com