नदाफ दांपत्य बनले अनाथांचे आई-बाबा! 

विशाल पाटील
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सातारा - कट्टापा रिक्षा स्टॉपवर, डोकोमो बसस्थानकावर, तर बंदुक्‍या रेल्वेस्टेशनवर भीक मागायचा. अशी एक, दोन, तीन नव्हे, तर 24 मुले भीक मागत होती. कारण त्यांना कोणी तरी सोडून दिले होते. आता मात्र हे चित्र बदलले आहे. ही मुले शाळा शिकत आहेत, त्यांना आई-बाबा मिळाले ते समीर आणि सलमा नदाफ या दांपत्याच्या रूपाने. स्वत-च्या तीन मुलांसह 27 मुलांचे संगोपन करण्याचे दिव्य हे दांपत्य लीलया पेलत आहे. तेही सरकारच्या एक रुपयाच्या मदतीशिवाय. 

सातारा - कट्टापा रिक्षा स्टॉपवर, डोकोमो बसस्थानकावर, तर बंदुक्‍या रेल्वेस्टेशनवर भीक मागायचा. अशी एक, दोन, तीन नव्हे, तर 24 मुले भीक मागत होती. कारण त्यांना कोणी तरी सोडून दिले होते. आता मात्र हे चित्र बदलले आहे. ही मुले शाळा शिकत आहेत, त्यांना आई-बाबा मिळाले ते समीर आणि सलमा नदाफ या दांपत्याच्या रूपाने. स्वत-च्या तीन मुलांसह 27 मुलांचे संगोपन करण्याचे दिव्य हे दांपत्य लीलया पेलत आहे. तेही सरकारच्या एक रुपयाच्या मदतीशिवाय. 

कोळे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील समीर हे आधी सांगलीला राहत होते. एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना 2015 मध्ये त्यांचे जीवन बदलवून टाकणारी घटना घडली. दोन दिवसांचे अर्भक उघड्यावर फेकले होते आणि दोन कुत्री त्याचे लचके तोडत होती. ती रात्र अस्वस्थ करणारी होती. त्याच दिवशी समीर यांनी ठरवले, की "त्या' अर्भकाप्रमाणे कोणी अनाथ असता कामा नये. हे काम सोपे नव्हते, त्यांनी प्रथम पत्नी सलमा यांना विचारले, "तू साथ देणार असशील, तर अनाथ मुलांना सांभाळायचे'. सलमा यांनीही होकार दिला. 25 एप्रिल 2015 रोजी त्या दोघांनी अलौकिक तपाला सुरवात केली. 

समीर वाहन खरेदी- विक्रीचा व्यवहार करतात. वडिलांचा गादी दुरुस्तीचा व्यवसाय असून, भाऊ इंजिनिअर आहे. अपुरे उत्पन्न असल्याने भावाने घरामध्ये वाटणी न मागता घर समीर यांनाच दिले, तर वडिलांनीही मुलांसाठी पैसे देण्यास सुरवात केली. प्रारंभी तीन अनाथ मुले मिळाली. त्यांच्यासाठी जिजाऊ बहुद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन करून अनाथ आश्रम सुरू केला. नंतर सांगली, सातारा, कागल, कर्नाटक, मुंबई येथून भीक मागत फिरणारी तब्बल 24 मुले आणली. ती आता अनाथ आश्रमात राहत आहेत. कोणाला आई-वडील नाहीत, कोणाची आई मनोरुग्ण आहे, तर कोणाची शरीरविक्रय करणारी. एका मुलीच्या सावत्र आईने चिमुकलीला भिंतीवर आपटल्याने तिचे सर्वच दात तुटलेले. सुरवातीला केवळ शिळे, खराब अन्न खाण्याची सवय असलेल्या या मुलांना बदलताना नदाफ दांपत्याला त्रासही झाला. आता हे दांपत्य स्वत-च्या तीन मुलांप्रमाणे या मुलांना सांभाळत असून, त्यांची तीन मुले कोणती हे कोणीच ओळखू शकत नाही, अशी स्थिती आहे. 

अंगणवाडीत सहा, पहिलीत सात, दुसरीत तीन, तिसरीत तीन, चौथीत चार, सातवीत दोन अशी मुले शिक्षण घेत आहेत. त्यांचे सर्व वेळच्या वेळी करण्यासाठी सलमा रोज पहाटे पाच वाजता उठतात. रोज सकाळी व रात्री आठ ही मुलांना जेवण देण्याची वेळ त्या नित्यनियमाने पाळतात. मुले भरपेठ जेवल्याशिवाय दोघांच्या घशातून घास खाली उतरत नाही. काही वेळा भाजीपाला खरेदी करण्यासही त्यांच्याकडे पैसे नसतात. मुले आजारी पडली तर आभाळच कोसळते. महिन्याकाठी 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. स्वत-चे एक मूल मोठे करताना आई-बाबांच्या नाकी नऊ येते, म्हणून तर हजारात, लाखात पगार घेणारे "हम दो, हमारा एक' म्हणतात. पण येथे तर 27 मुलांचे आई-बाबा होण्याचे शिवधनुष्य समीर आणि सलमा नदाफने पेलले आहे. 

मानवता धर्माची शिकवण 
ज्यांना आई-वडील माहीत नाहीत, त्यांना जन्मतारीख कशी माहीत असणार? पण शाळेत जायचे तर आधार कार्ड बंधनकारकच. समीर यांनी धावफळ करून तेही मिळवले. प्रारंभी मुले शाळेत जाऊ लागली. पण, इतरांच्या तुलनेत शैक्षणिक प्रगती कमी होती. शिक्षक ही खंत नदाफ यांना बोलावून दाखवत. तेव्हा आता समीर स्वत- दोन तास रोज या मुलांना शिकवत आहेत. कोणाचा भाषण करण्यात, कोणाचा गायनात, तर कोणाचा वादनात हातखंडा आहे. येथला जात-धर्म संपला असून, केवळ मानवता धर्मच शिकवला जात आहे. 

स्वत-चे नाव दिले  
आलिया, साक्षी, प्रवीण, शरयू, प्रणाली, प्रणव, साहिल, पाकीजा, सॉलिया... ही काही या मुलांची मूळ नावे नाहीत. या मुलांना कधी अनाथ वाटू नये, यासाठी समीर यांनी त्यांना स्वत-चे नाव दिले असून, ही मुलेही स्वत-च्या नावापुढे वडील म्हणून समीर यांचे नाव अभिमानाने घेतात.

सकारात्मक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news satara sammer nadaf family positive story