त्यांनी झिडकारले; पोलिसाने कवटाळले ! 

संजय साळुंखे
Friday, 20 December 2019

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम करताना पाेलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी नवजात अर्भकांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. या अर्भकांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांनाही त्यांनी पालनपोषणासाठी लागणाऱ्या रकमांचे धनादेशही दिले आहेत.

सातारा : विश्रांतवाडीतील (पुणे) एकतानगरातील स्नेहगंध अपार्टमेंटच्या इमारतीत कचऱ्याच्या डब्यात आज सकाळी एक दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले. या अर्भकाला जीवदान देतानाच 18 वर्षांपर्यंत तिच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे दातृत्व पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दाखवले. या प्रकारातून खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले. या अर्भकावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अर्भकाचे नाव "संघर्षा' असे ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - चिमुरडी उभारतेय माणुसकीची भिंत
 
विश्रांतवाडी येथील स्नेहगंध अपार्टमेंटमध्ये सकाळी सव्वाआठ वाजता कचरा गोळा करणाऱ्या कचरा वेचक लक्ष्मी डेबरे यांना कचऱ्याच्या डब्यात हालचाल जाणवली. एका कापडी स्कार्फमध्ये गुंडाळून नवजात अर्भक कचऱ्याच्या डब्यात टाकलेले होते. त्यांनी ते अर्भक बाहेर काढून पाहिले. इतर महिला कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी ही माहिती महापालिकेचे पर्यवेक्षक भगवान राऊत यांना दिली. आळंदी रोड चौकीतील महिला कर्मचारी ऋतिका जमदाडे यांनी ही माहिती देताच श्री. कदम यांनी तात्काळ हे नवजात अर्भक ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची सूचना केली.

अवश्य वाचा - ट्रेकर्स म्हणतात पुन्हा येईन...पुन्हा येईन... 

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा शासकीय सोपास्कार पूर्ण होत असतानाच खाकी वर्दीतील अधिकाऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवले. विश्रांतवाडी ठाण्यात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या रवींद्र कदम यांनी माणुसकीच्या भावनेतून या नवजात अर्भकाच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली. या अर्भकाचा 18 वर्षांपर्यंत शिक्षणासह इतर सर्व खर्च ते स्वतः करणार आहेत. श्री. कदम यांनी आजच या अर्भकाचे नामकरण केले असून, तिचे नाव "संघर्षा' असे ठेवले आहे. दरम्यान, "नकोशी'ला दत्तक घेण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला असून, त्यात डॉक्‍टर दांपत्याचाही समावेश आहे.

अवश्य वाचा -  ताई तू घाबरु नकाेस आम्ही आहाेत

कटगुण (ता. खटाव) हे रवींद्र कदम यांचे मूळ गाव; पण त्यांचे बालपण पुसेगावात गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबई पोलिस दलात भरती झाले. तेथे काम करतानाच खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना पदोन्नती मिळाली. त्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, आजरा, चंदगड अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केले; पण काम करताना काही तरी वेगळे करण्याची भूमिका त्यांनी कधीच सोडली नाही. कोल्हापुरात (राजारामपुरी) काम करताना लाच देण्यासाठी आलेल्यालाच त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकवले होते. 

अनेक मुलांना दिले छत्र 

आपल्या कार्यकालात रवींद्र कदम यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम केले. तेथे काम करतानाही नवजात अर्भके सापडली. त्यातील सुमारे 15 नवजात अर्भकांच्या पालनपोषणाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. या अर्भकांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना त्यांनी पालनपोषणासाठी लागणाऱ्या रकमांचे धनादेश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Inspector Ravindra Kadam Adopted Infant In Pune