कन्याकुमारी ते महाड सायकलवरून केली नेत्रदानाबद्दल जनजागृती

सुनील पाटकर
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

जवळपास 14 दिवसांचा प्रवास या तीन युवकांनी केला. या प्रवासादरम्यान नेत्रदानाबाबत जनजागृती केली.

महाड : नेत्रदानाविषयी जनजागृती करत महाडमधील तीन युवकांनी कन्याकुमारी ते महाड असा 1 हजार 540 किमीचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला. आज 2 नोब्हेंबरला दुपारी महाडमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. युथ हाँस्टेल, विविध शाळेतील विध्यार्थ्यानी तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रवासादरम्यान आलेले अनुभवही तिघांनी सांगितले. महाडमधील मकरंद जोशी, गिरीश हडप आणि पुणे येथील चिन्मय गंधे या तीन तरुणांनी कन्याकुमारी ते महाड असा जवळपास 1 हजार 540 किमीचा प्रवास १४ दिवसांत सायकलवरून पूर्ण केला. 

तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, आणि महाराष्ट्र या चार राज्यांतून हा प्रवास पूर्ण केला. आज महाडमध्ये या तिघांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महाडमधील शेडाव नाका ते शिवाजी चौक या दरम्यान विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत तर विविध संघटनांच्या
 पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाडमधील रोटरी क्लबचे आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, शिवाई पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष काळे, डॉ. जितेंद्र खाजगीवाले, राजेश बुटाला, ड्युफलाँन कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत मोरे, व्यापारी प्रभाकर म्हामुणकर, अशोक तलाठी, ट्रेकर सुखद राणे, संजय मेहता, संजीव मेहता, प्रदीप शेठ, मोहन शेठ, राष्ट्रवादीचे महाड विधानसभा अध्यक्ष भास्कर शिंदे, माजी सभापती संजय चिखले यांनी शिवाजी चौक येथे उपस्थित राहून या तीन सायकलस्वारांचे स्वागत केले. 20 नोव्हेंबरला महाडमधील या तीन युवकांनी कन्याकुमारी येथून महाडला येण्यास प्रारंभ केला. 

जवळपास 14 दिवसांचा प्रवास या तीन युवकांनी केला. या प्रवासादरम्यान नेत्रदानाबाबत जनजागृती केली. याकरीता त्यांनी एक फलकदेखील तयार केला होता. यामुळे प्रवासात अनेक पर्यटकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. यापूर्वी मकरंद जोशी, गिरीश हडप, चिन्मय गंधे या युवकांनी सायकलवरून इतर स्थळांचा देखील प्रवास केला आहे. कन्याकुमारी ते महाड हा प्रवास जरा खूप लांबीचा आहे, मात्र तरीदेखील यांनी प्रतिदिन किमान 120 किमीचा पल्ला गाठत हा प्रवास पूर्ण केला. 

या प्रवासात आम्हाला पर्यटक आणि तेथील स्थानिक लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. नेत्रदान चळवळीबाबत तर अनेकांनी कौतुक केले. तेथे भेटलेला जर्मन पर्यटक मॅक्सी याने तर ही चळवळ आपण जर्मनमध्ये देखील सुरू करू असे सांगत आमचे कौतुक केले. तर एका ठिकाणी मराठी दांपत्यांने आमचे जेवणाची व्यवस्था केली.
- मकरंद जोशी

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad news kanyakumar to mahad cycle tour for eye donation