गावात काेणीही उपाशी राहू नये, यासाठी गुढेकरांचा मायेचा हात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

समाजातील विविध घटक मदतीसाठी पुढे आले आहेत. इवलाशा गावानेही आपल्या घासातील घास देऊन माणुसकी जपली आहे. 
 

ढेबेवाडी (जि.सातारा) ः शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्यापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी गुढे (ता.पाटण) येथे "एक मूठ धान्य गरजूंसाठी' हा अभिनव उपक्रम राबवला. अनेक ग्रामस्थांनी त्यांना मिळालेल्या धान्यातील थोडे- थोडे धान्य उत्स्फूर्तपणे गावात ठेवलेल्या पिंपात जमा केले. त्यानंतर त्याचे वंचित कुटुंबांना वाटप केले. सध्याच्या अडचणीच्या काळात गुढेकरांनी आपल्याच माणसांना घासातील घास देऊन जपलेली ही माणुसकी सध्या कौतुकाचा विषय बनली आहे.
 
गुढेतील विविध कार्यकारी सेवा सोसायटीतर्फे स्वस्त धान्य दुकान चालवले जाते. गावातील नागरिकांना शासकीय धान्याचा पुरवठा त्याद्वारे केला जातो. सोसायटीचे अध्यक्ष अप्पासाहेब कदम असून, महादेव पाटील दुकानाचे कामकाज पाहतात.

लॉकडाउनच्या काळात शासनातर्फे शिधापत्रिकाधारकांना वाढीव व नियमित धान्यपुरवठा सुरू असला, तरी काही तांत्रिक अडचणीमुळे थोडीफार कुटुंबे त्यापासून वंचित राहात आहेत. अनेक गावांत असे चित्र आहे. धान्य वाटपावरून वादावादी व तक्रारींचे प्रकार कानावर येत असताना गुढेकरांनी घेतलेला निर्णय मात्र, परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. "एक मूठ धान्य गरजूंसाठी' या उपक्रमासाठी केलेल्या आवाहनाला तेथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वस्त धान्य दुकानात धान्य नेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी दुकानाबाहेर ठेवलेल्या पिंपात स्वइच्छेने गहू, तांदूळ जमा केले. बघता बघता साधारणपणे दीड क्विंटल तांदूळ व एक क्विंटल गहू जमा झाले. मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, ग्रामसेवक प्रसाद यादव यांच्या हस्ते त्याचे वाटप झाले. शिधापत्रिकेत अडचणी असलेल्या गावातील अनेक गरजू, तसेच मुंबईकर कुटुंबांबरोबरच परजिल्ह्यातून आलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांनाही त्याचा लाभ मिळाला. या वेळी महादेव पाटील, राजेंद्र पाटील, भरत कदम, अण्णासाहेब गुरव, अमोल कदम, शरद देसाई, मनोज देसाई आदी उपस्थित होते.

सातारा : शनिवार घातवार; 40 रुग्ण वाढले; निर्बंधांचा कचाटा वाढणार

कऱ्हाडातील शेतकरी म्हणतायंत...चल चल गड्या ऊस बघायला..

50 कुटुंबांना मदत करुन नव दांपत्य संसार वेलीवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Food Grains Distributed To Needy Person By Gudhe Village Patan