esakal | 'मदत पी.एच.सी' उपक्रमातून लाखाेंची औषधे, सॅनिटायझर मिळाले
sakal

बोलून बातमी शोधा

malvadi rurual hospital

'मदत पी.एच.सी' उपक्रमातून लाखाेंची औषधे, सॅनिटायझर मिळाले

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : घेणारा हात विश्वासार्ह असला तर देणारे हजार हात पुढे येतात. याची प्रचिती प्राथमिक आरोग्य केंद्र मलवडीच्या (Malvdi) कर्मचाऱ्यांना आली. माण तालुका येथे युवकांनी 'मदत PHC' या केलेल्या आवाहनाला दानशूर व्यक्तींनी भरभरुन साथ दिल्याने मलवडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला (primary health center) लाख मोलाची मदत मिळाली. satara marathi news help phc positive story

मलवडीचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे माणच्या पश्चिम भागातील सर्वसामान्य, गरीब, गरजू रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. येथे येणारे प्रत्येक वैद्यकीय अधिकारी अतिशय उत्तम सेवा देतात अन त्यांना कर्मचाऱ्यांकडून चांगली साथ सुध्दा मिळते. त्यामुळे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या नेहमीच जास्त असते. कोरोना महामारीत येथे कोरोना चाचणी, लसीकरण सुध्दा केले जात आहे. त्यामुळे सध्या या केंद्रातील कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आहे.

या परिस्थितीतही रुग्णांना चांगली सेवा अन वेगळं काही कसे देता येईल याचा सतत विचार येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सुरु असतो. वैद्यकीय अधिकारी डाॅ. मनोज कुंभार व डाॅ. भाग्यश्री नवगिरे यांनी येथील युवा वर्गास मदतीची अपेक्षा व्यक्त केली. तर औषधनिर्माता पी. के. जाधव तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ रेश्मा शेख, हर्षा जाधव व गट प्रवर्तक साधना गायकवाड यांनी कशाची आवश्यकता आहे ते सांगितले. त्यानंतर रुपेश कदम या युवकाच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार यांच्या सहकार्याने सुरु झाले 'मदत पी.एच.सी. (PHC) हे अभियान.

रुपेश कदम यांनी केलेल्या 'मदत पी.एच.सी. (PHC)' या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. गणेश कदम (बोथे), राहुल जगदाळे (फौजी), किरण खरात (गुरुजी), रवि शिवाजी मगर (मुंबई), चंदूशेठ सस्ते (मुंबई), प्रविण सुर्यवंशी (भांडवली), निलेश घोरपडे (टाकेवाडी), सचिन सुर्यवंशी (भांडवली), अमर भोसले (आंधळी), राजू इंगळे (परकंदी), गणपत कुंभार (मलवडी, एम. के. भोसले (बिजवडी), शिवाजी भोसले (बिजवडी), गजानन जाधव (मलवडी) महिमानगड फाउंडेशन, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मलवडीचे सर्व कर्मचारी व काहींनी निनावी आर्थिक मदत केली.

नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेवून मदत करणारे महतं श्री शांतिगिरीजी महाराज यांनी मदत करण्याचा निर्णय घेवून सर्व औषधांचे बिल भरले. त्यांनी केलेल्या मोठ्या मदतीमुळे साधारण एक लाख रुपयांची औषधे खरेदी करणे शक्य झाले. जमा झालेल्या रक्कमेतून कोरोना साथीत आवश्यक असलेली औषधे, सॅनिटायझर, N95 मास्क, ग्लोव्हज, ऑक्सिमीटर, ग्लुकोमीटर आदी साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करुन ते आज प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबसो पवार, सरपंच दादासाहेब जगदाळे, डाॅ. मनोज कुंभार, संजय महाजन, श्रीकांत कदम, दादा जगदाळे, संतोष घाटगे, तानाजी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

"मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अतिशय चांगल्या पध्दतीने सुरु आहे. त्यामुळेच त्यांनी मागणी केल्यानुसार आवश्यक साहित्य दानशूर व्यक्ती व संस्थाच्या मदतीमुळे त्यांना देता आले याचा आनंद आहे."

रुपेश कदम, मलवडी.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

"आम्ही आमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतो. पण समाजाने आमच्या कामाची दखल घेवून आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली तर आमचा हुरुप वाढतो."

डाॅ. मनोज कुंभार, वैद्यकीय अधिकारी.

हेही वाचा: गोंदवले : "श्री' महाराजांची परंपरा आजही राखली जात आहे

हेही वाचा: माजी आमदार प्रभाकर घार्गेंवर अटक वॉरंट; पडळ खूनप्रकरण भोवणार?

loading image
go to top