अभिमानास्पद! अंबवडेत मुखी हरिनाम घेत ग्रामस्वच्छता; आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

पांडुरंग बर्गे
Friday, 19 February 2021

गाडगे महाराज स्वच्छता अभियानांतर्गत वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हातात खराटे घेऊन अंबवडे गावात स्वच्छता मोहीम राबवली.

कोरेगाव (जि. सातारा) : दिवस उगवतो न उगवतो तोच अंगावर पांढरे शुभ्र कपडे, कोणी धोतर, तर कोणी पायजमा घातलेला, डोक्‍यावर टोपी, कोणी फेटा, कपाळी अबीर-बुक्का किंवा गंधाचा टिळा, मुखी भगवान पांडुरंगाचे नाव आणि हातात झाडू घेतलेल्या आबालवृद्धांनी ग्रामस्वच्छता सुरू केली अन्‌ गाव खडबडून जागे झाले. हा हा म्हणत गाव चकाचक झाले. 

अंबवडे संमत कोरेगाव येथे ही किमया पाहायला मिळाली. निमित्त होते अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कोरेगाव तालुका व शहर शाखेच्या वतीने आयोजित पहिल्या संत शिरोमणी गाडगे महाराज स्वच्छता अभियानाचे. या अभियानांतर्गत श्री खंडोबा मंदिर परिसर व गावातील मुख्य रस्ते वारकरी मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांनी हातात खराटे घेऊन मुखी भगवान पांडुरंगाचे नाव घेत स्वच्छ केले. उपक्रमात महिला वारकऱ्यांनीही सहभाग घेतला. वारकऱ्यांच्या या उपक्रमामध्ये अंबवडे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, महिला, युवा कार्यकर्ते, लहान-थोरांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि गाव स्वछ करण्यात योगदान दिले. हा कार्यक्रम सुमारे तीन तास सुरू होता. 

हे पण वाचा- एकदम कडक सॅल्यूट! महाबळेश्वर-कोल्हापूर बसमध्ये शिवजयंती साजरी करुन महाराजांना दिली अनोखी मानवंदना

स्वच्छता अभियानाची सांगता झाल्यानंतर मंडळाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार माळवदे महाराज (कुमठे) यांचे कीर्तन झाले. त्यात त्यांनी अध्यात्मिक प्रबोधनाबरोबर सदाचाराचे पालन करण्याचे आवाहन केले. स्वच्छता अभियानात सहभागी वारकऱ्यांचा ग्रामस्थांनी यथोचित सन्मानही केला. पुढील स्वच्छता अभियान रविवार 14 मार्च रोजी शिरंबे (ता. कोरेगाव) येथे याच पद्धतीने राबवण्याचे जाहीर करून त्यात सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. 

हे ही वाचा- मोहीम फत्ते! शिवविचार जगासमोर आणण्यासाठी रोहिडेश्वर, रायरेश्वरवर डॉक्‍टरांचे गिर्यारोहण

प्रबोधन आणि स्वच्छता अभियान... 

वारकरी मंडळाच्या सातारा जिल्हा शाखेने तालुकानिहाय शाखा स्थापन केल्या असून, या शाखांनी गावोगावी ज्ञानेश्वरी पारायणे, गाथा पारायणे सुरू करून अध्यात्मिक प्रबोधन करताना स्वच्छता अभियान, दारूबंदी, व्यसनमुक्ती, बालसंस्कार केंद्रे, संगीत साधना, पखवाज आदी वाद्य वाजवण्याचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार नुकत्याच स्थापन झालेल्या व पदग्रहण झालेल्या कोरेगाव तालुका व शहर वारकरी मंडळाच्या शाखेच्या वतीने हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Sanitation Campaign In Ambawade Village