एकदम कडक सॅल्यूट! महाबळेश्वर-कोल्हापूर बसमध्ये शिवजयंती साजरी करुन महाराजांना दिली अनोखी मानवंदना

हेमंत पवार
Friday, 19 February 2021

संभाजीनगर आगाराचे चालक बाळासाहेब कांबळे यांनी बसमध्ये शिवजयंती साजरी करुन शिवरायांना अनोख्या प्रकारे अभिवादन केले आहे.

सातारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, संभाजीनगर आगार (कोल्हापूर विभाग) येथील चालक बाळासाहेब हिंदुराव कांबळे यांनी आज महाबळेश्वर-कोल्हापूर या मार्गावरील आपल्या एसटी बसवर कर्तव्य बजावत असताना बसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावली व शिवजयंती साजरी केली. 

बाळासाहेब कांबळे यांनी बसला दोन्ही बाजूंनी भगवे झेंडे लावले होते. तद्नंतर बस सातारा बसस्थानकात घेऊन आले. सातारा आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तसेच आज एसटी महामंडळातर्फे प्रवाशी दिन साजरा केला जातो, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती व प्रवाशी दिन या दोन्ही उत्सवाच्यानिमित्ताने कांबळे यांनी महाबळेश्वर ते कोल्हापूर प्रवास करणा-या प्रवाशांना पेढे वाटून आनंद साजरा केला. 

हे पण वाचा- मोहीम फत्ते! शिवविचार जगासमोर आणण्यासाठी रोहिडेश्वर, रायरेश्वरवर डॉक्‍टरांचे गिर्यारोहण

याकामी संभाजीनगर आगाराचे वाहक राहुल सरनाईक, चालक जनक जाधव यांचे सहकार्य लाभले. ही बसमधील जयंती प्रवाशांसाठी कुतूहल निर्माण करणारी होती, असे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले. चालक कांबळे हे नेहमीचं विविध राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याचे कार्य करतात. 2020 साली त्यांनी बसमध्ये जयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या एक हजार पुस्तकांचे मोफत वाटप केले होते. तसेच ते बसमध्ये प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, वर्तमानपत्रे, फिरते वाचनालय, मोबाईल चार्जिंग सुविधा, कचरा पेटी, औषधे, सॅनिटायझर आदी सुविधाही देखील उपलब्ध करून देतात. त्यांना आजवर महाराष्ट्र राज्यातील 27 सामाजिक सेवा संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले असून 9 फेब्रुवारी 2021 या दिवशी मुंबई येथे कामगार कल्याण मंडळाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊन राज्य कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Shiv Jayanti Celebration In Mahabaleshwar Kolhapur ST Bus In Satara