आहेर नको, रक्तदान करा! पुण्यातील आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा; माजी मंत्र्यांकडूनही कौतुक

सुनील शेडगे
Friday, 22 January 2021

सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शासकीय पातळीवरून, आरोग्य यंत्रणेकडूनही सातत्याने रक्तदानाचे आवाहन केले जात आहे.

सातारा : सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शासकीय पातळीवरून, आरोग्य यंत्रणेकडूनही सातत्याने रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर लग्नमंडपातच रक्तदान शिबिर आयोजनाचा अभिनव उपक्रम नुकताच झाला. त्याचे विशेष कौतुक होत आहे. 

सासवड (जि. पुणे) येथील जगताप परिवारातील हनुमंत जगताप यांचे चिरंजीव अविनाश अन्‌ राजापूर (ता. खटाव) येथील राजेंद्र बबनराव राजेघाडगे यांची कन्या रूपाली यांच्या विवाहाच्या निमित्ताने हा आगळा उपक्रम आयोजिण्यात आला. फलटणनजीकच्या सुरवडी येथे हा विवाहसोहळा थाटात झाला. त्यात एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजिण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांच्या संकल्पनेतून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. "आहेर नको रक्तदान करा' असा संदेश देत वधू अन्‌ वर पक्षाकडील 25 हून अधिक जणांनी स्वयंस्फूर्तीने या शिबिरात सहभागी होत रक्तदान केले. 

सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना

या विवाहाला माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी हजेरी लावली. त्यांनीही रक्तदानाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. सासवडचे माजी उपाध्यक्ष वामनराव जगताप, नीरा बाजार समितीचे भानूकाका जगताप यांच्यासह विविध मान्यवर या वेळी उपस्थित होते. उल्लेखनीय म्हणजे सर्व वऱ्हाडी मंडळींना या वेळी मास्क अन्‌ सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. हडपसर येथील अक्षय ब्लॅड बॅंकेने या उपक्रमाला विशेष साहाय्य केले. लग्नमंडपातील या अनोख्या रक्तदान शिबिराचे विशेष कौतुक होत आहे. 

मी काळाच्या उदरात, विलीन झाल्यावर माझी सर्वजण आठवण काढतील

बदलता काळ, बदलती आव्हाने लक्षात घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याला समाजातून चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे.
-संतोष जगताप, अध्यक्ष एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान सासवड, ता. पुरंदर 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Positive News Blood Donation Camp At The Wedding Ceremony In Pune