सावित्रीच्या लेकीचा संघर्ष;पतीच्या आत्महत्येनंतर शेतात राबून कष्टाने सावरला प्रपंच

मुकुंद पिंगळे
Sunday, 3 January 2021

आपल्यासारखी वेळ मुलींवर येऊ नये म्हणून मुलींचे शिक्षण पूर्ण करून भविष्य घडविण्यासाठी ती शेतात राबते आहे, संकटांशी दोन हात करते आहे. ही जिद्द अन् संघर्षाची गाथा आहे वळवाडी (ता. मालेगाव) येथील संगीता पवार या शेतात राबणाऱ्या सावित्रीची. 

नाशिक : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. अशा संकटांशी मुकाबला करून तिने स्वतःला सावरले. शेतात बोअरला पाणी लागल्याने सिंचनाची सोय झाली. आपल्यासारखी वेळ मुलींवर येऊ नये म्हणून मुलींचे शिक्षण पूर्ण करून भविष्य घडविण्यासाठी ती शेतात राबते आहे, संकटांशी दोन हात करते आहे. ही जिद्द अन् संघर्षाची गाथा आहे वळवाडी (ता. मालेगाव) येथील संगीता पवार या शेतात राबणाऱ्या सावित्रीची. 

अवघी दोन एकर जमीन तीही खडकाळ असल्याने हाती उत्पन्न नव्हते. या संकटांमुळे पती ज्ञानदेव पवार यांनी घरातच आत्महत्या केली. पुढे संसार उघड्यावर पडला. वृद्ध सासरा, दोन मुली अन् लहान मुलांचा सांभाळ करताना संगीताताईंना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. दरम्यान, वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘बायफ’ संस्थेच्या वतीने २०१६ मध्ये ‘नवजीवन प्रकल्प’ राबविण्यास सुरुवात झाली. याच माध्यमातून २०१७ मध्ये ५६ हजार ५२४ रुपयांच्या मदतीतून बोअरवेल खोदून पंप बसवून दिला. या मदतीने त्यांच्या आयुष्यात ‘नवजीवन’च घडले.

महाराष्ट्रभर साजरा होणारा काय आहे 'सावित्री उत्सव'?

संगीताताईंची विनायक दादांनी वेळोवेळो चौकशी केली, लेकीची माया देऊन मार्गदर्शन केले. त्यामुळेच पावसाच्या पाण्यावर फक्त बाजरी पिकविणाऱ्या या कुटुंबाने तूर, कांदा, मिरची घेतली.  पीक नियोजन करून चांगले उत्पादन घेऊन  मालेगाव, साक्री बाजारात शेतीमाल विकू लागल्या. यामुळेच कधी न पाहिलेला हजार रुपयांचा बंडल त्यांच्या कष्टामुळे त्यांना हाती आला. त्यांना व्यवहार कळू लागला. त्यामुळेच काही हजारांत येणारे उत्पन्न लाखापर्यंत गेले. संसाराचा गाडा सुरळीत होऊन डोक्यावरचे कर्ज फिटले. मेहनतीने कमविलेल्या एक एक पैशातून स्वतःसह कुटुंबाला सावरून सासऱ्यांचा दवाखाना अन् मुलींचे शिक्षण त्या करत आहेत.

Exclusive:पुष्‍पाताई म्हणजे शेतीतील चालते बोलते विद्यापीठ!;शेती कसण्याची उमेद कायम

आता त्या अर्थसाक्षर होऊन बाजारपेठेच्या मागणीनुसार पिके घेऊ लागल्या आहेत.  मोठी मुलगी दीपालीला पोलिस अधिकारी व्हायचे आहे, तर लहान मुलगी प्रतीक्षा व मुलगा गौरवच्या शिक्षणासाठी पोटाला चिमटा देऊन दोन पैसे साचवीत आहेत. त्यामुळे अनंत संकटे सोसून जिद्दीने लेकींचे भविष्य घडविण्यासाठी झटणारी ही ‘सावित्री’ आदर्श आहे. समाजाने अशा घटकांना जिद्दीने उभे करून स्त्रियांचा आत्मविश्‍वास वाढवणे गरजेचे आहे. तरच स्त्रीमुक्तीतून स्त्रीशक्तीचा उत्कर्ष साधने शक्य होईल.

Success Story:10 वर्षे सातत्य ठेवत पिकवला पुदिना;आज कमावत आहेत लाखों रुपये

फौजदार करणारच! 
माझ्या लेकींचा बाप गेला. त्या पोरक्या झाल्या. त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायांवर उभे करणार. माझी मोठी लेक बारावीला गेली, तिला फौजदार व्हायचे आहे. यासाठी दिवसरात्र कष्ट करणार, शेतीत राबणार अन् मी लेकीला फौजदार करणारच,असा निर्धार संगीताताई बोलून दाखवितात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story of a woman working in the field of Sangeeta Pawar in Malegaon taluka

Tags
टॉपिकस
Topic Tags: