तो मेसेच चुकीचा- गुहागर तालुक्यातील 34 मच्छीमार गावी परतले ; नाखवानेच पाठविल्या बोटी...

 मयूरेश पाटणकर
गुरुवार, 26 मार्च 2020

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मच्छीमार कुलाबा, करंजा येथे मोठ्या यांत्रिकी नौकांवर नोकरी करतात. पकडलेली मच्छी बंदरात देणे, रेशन भरणे किंवा नैसर्गिक आपत्तीचे वेळी फक्त ते बंदरात उतरतात.

गुहागर (रत्नागिरी) : संपूर्ण देश लॉकडाऊन केल्यामुळे मच्छीमारी व्यवसायदेखील बंद पडला आहे. त्यामुळे कुलाबा, करंजा येथे गेलेले मच्छीमार पुन्हा गावाला परत येऊ लागले आहेत. गुहागर तालुक्यातील तीन गावातील वेळणेश्वर (16),  कारुळ (7), असगोली (14) एकूण 34 मच्छीमार गावी परतले आहेत. त्यांना त्यांच्या गावातच विलग करून ठेवण्यात आले आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मच्छीमार कुलाबा, करंजा येथे मोठ्या यांत्रिकी नौकांवर नोकरी करतात. गणेशोत्सव, दत्तजयंती, माघी गणेश जयंती, गुढी पाडवा आणि हनुमान जयंती असे काही सण सोडल्यास 15 ऑगस्ट ते 1 जून या कालावधीत ते बहुतांश काळ बोटीवरच असतात. पकडलेली मच्छी बंदरात देणे, रेशन भरणे किंवा नैसर्गिक आपत्तीचे वेळी फक्त ते बंदरात उतरतात.

हेही वाचा- Corona Impact : आगीतून फोफाट्यात मच्छीमारांची झालीय अवस्था...

कोरोनामुळे देश लॉकडाऊन केल्यानंतर मच्छीमारीचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे ही मंडळी समुद्रातून पुन्हा आपापल्या बंदरात परतली. नाखवाकडे (यांत्रिक नौकेचा मालक)  21 दिवस त्यांची रहाण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. त्यामुळे नाखवांनी या मच्छीमारांना गावी जाण्यास सांगितले. रस्ते बंद, प्रवासी वहातूक बंद यामुळे जलमार्गाने या सर्वांना पुन्हा घरी पाठविण्याची व्यवस्था देखील नाखवानेच केली. 

हेही वाचा-रस्ता अडवला, खडा पहारा ; पाचल गाव झाले स्वतःहून क्वारंटाईन..

लॉकडाऊनमुळे मच्छीमार व्यवसाय बंद​

गुढी पाडव्याच्या सणाला गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील 16 मच्छीमार स्वतंत्र बोट घेऊन परतले. तर कारुळमधील 7  आणि असगोलीतील 14 मच्छीमारांना करंजा (जि. रायगड) मधील नाखवाने सोडले व बोट परत करंजाला गेली. असगोलीत बाहेरून आलेल्या मच्छीमारांना सरपंच शंकर कटनाक यांनी गावातील परिस्थिती समजावून सांगितली. घरी न जाता समुद्रकिनार्‍यावरूनच हे सर्वजण गुहागर पोलीस ठाण्यात गेले. तेथे सर्व माहिती दिल्यानंतर आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर असगोली गावात त्यांची स्वतंत्र रहाण्याची व्यवस्था सरपंच शंकर कटनाक यांनी केली.

समाजमाध्यमांमधुन असा फिरु लागला मेसेज

वेळणेश्वर मधील 16 जणांची व्यवस्था  जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली आहे. करंजा येथून मिळालेल्या विश्वसनीय वृत्तानुसार 24 व 25 मार्चला रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी एकूण 3 बोटी निघाल्या. त्या दाभोळ बंदरात पोचल्या. तेथून हे मच्छीमार गावी परतले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांमधुन भाड्याने केलेल्या बोटीने खलाशी आल्याचे संदेश फिरू लागले. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. ज्यांना रहायला घरे नाहीत त्यांनी गावी यायचे नाही तर कुठे जायचे. जाणीवपूर्वक आमच्या समाजाला बदनाम केले जात आहे. अशी प्रतिक्रिया जबाबदार व्यक्तीने यांनी व्यक्त केली

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 34 fishermen from Guhagar taluka returned to the village kokan marathi news