कुडाळमध्ये या 50 अनधिकृत बांधकामांना बसणार चाफ...

50 works unauthorized in kudal kokan marathi news
50 works unauthorized in kudal kokan marathi news

कुडाळ (सिंधुदूर्ग) : शहरात 50 बांधकामे (कमर्शिअल) अनधिकृत असल्याची माहिती येथील नगरपंचायतीच्या सभेत प्रशासनाने देत 1 मार्चपासून ही बांधकामे हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा काल (ता.13) नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्षा सौ. सायली मांजरेकर, मुख्याधिकारी नितीन गाढवे आदींसह नगरसेवक उपस्थित होते.

शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या विषयावर या सभेत जोरदार चर्चा झाली. शहरात 50 बांधकामे (कमर्शिअल) अनधिकृत असल्याची माहिती प्रशासनाने या सभेत दिली. यातील 25 बांधकामांना प्राथमिक व अंतिम नोटीसा बजावण्यात आल्या असून उर्वरित 25 बांधकामांना प्राथमिक दोन नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना अंतिम नोटीसा बजावणे बाकी असून या नोटीसा कारवाई सुरू करण्याआधी 24 तास अगोदर बजावण्याची तरतूद असल्याचे सांगण्यात आले.

या चर्चेत बाळा वेंगुर्लेकर, गणेश भोगटे, सचिन काळप, एजाज नाईक, प्रज्ञा राणे, संध्या तेरसे, राकेश कांदे, जीवन बांदेकर यांनी सहभाग घेतला. या अनधिकृत बांधकामांच्या यादीतील बांधकामांचे निवासी, व्यावसायिक असे वर्गीकरण करण्याची सूचना एजाज नाईक यांनी मांडली. गणेश भोगटे यांनी या कारवाईत राजकारण झाल्यास आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला. प्रज्ञा राणे यांनी कोणालाही न दुखावता यात सुवर्णमध्य काढला जावा असे सुचविले. बाळा वेंगुर्लेकर यांनी आधी रस्त्यालगतची बांधकामे तोडा, घरे पाडू नयेत असे सुचविले. हि अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई कधी सुरू होणार असा प्रश्न नगरसेवकांनी विचारताच 1 मार्च पासून ही हटाव मोहीम हाती घेण्यात येईल असे प्रशासनाकडून सभेत सांगण्यात आले.

कारवाई बेधडच होणार

तर नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी हि कारवाई करतेवेळी कमर्शिअल अनधिकृत बांधकामांबाबत कोणतीही तडजोड नाही, कारवाई ही बेधडच होणारच आहे. कोणीही नगरसेवकांनी यावेळी हस्तक्षेप करू नये सांगितले. कुडाळ मालवण रस्त्यालगत तसेच पोलिस स्टेशन नजिक रस्त्यालगतचे बेकायदेशीर स्टॉल हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही त्यांनी सभेत सांगितले. नगरसेविका उषा आठल्ये, अश्‍विनी गावडे, सरोज जाधव, नगरसेवक आबा धडाम, सुनील बांदेकर, विनायक राणे, मेघा सुकी आदी उपस्थित होते. विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली. 

पालकमंत्री व आमदार यांची आढावा बैठक
नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेंतर्गत लक्ष्मीवाडी भंगसाळ नदीजवळील महापुरूष मंदीराशेजारी उद्यान विकसित करणे या कामासाठी भूसंपादन करण्याबाबत विचार विनिमय करण्याबाबतचा विषय या सभेत ठेवण्यात आला होता. नगराध्यक्ष तेली यांनी हा विषय प्रशासनाने सभेत ठेवल्याचे सांगितले तर मुख्याधिकारी गाढवे यांनी या कामाबाबत पालकमंत्री व आमदार यांनी जानेवारीत आढावा बैठक घेऊन त्यांनी केलेल्या सुचनेनुसार हा विषय या सभेपुढे पुन्हा ठेवण्यात आल्याचे सांगितले.

त्यानुसार चर्चा सुरू असताना या उद्यानाच्या भूसंपादनाला सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. सत्ताधाऱ्यांमधून नगरसेवक सुनील बांदेकर, सौ.संध्या तेरसे, श्री.राणे, राकेश कांदे यांनी तर विरोधी शिवसेना नगरसेवकांमधून बाळा वेंगुर्लेकर, सचिन काळप, गणेश भोगटे, जीवन बांदेकर, प्रज्ञा राणे व मेघा सुकी यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

हेही वाचा- या शेतकऱ्यांचा सुटला हा प्रश्‍न कायमस्वरुपी..

...तर एवढा विरोध का? 
शिवसेना नगरसेवक सचिन काळप यांनी आक्रमक पवित्रा घेत शहरात होत असलेल्या या विकासकामालाच एवढा विरोध का? असा सवाल उपस्थित केला. माजी पालकमंत्री तथा आ. दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष व सत्ताधाऱ्यांनी शहरातील प्रस्तावित 35 कामे मंजूर करावीत, नंतर या दोन कोटींच्या कामाला मंजूरी देतो, असे मान्य केले होते. त्यानुसार आमदार केसरकरांनी या सर्व कामांसाठी 5 कोटी 84 लाखांचा निधी मंजूर केला. असे असताना आता पुन्हा विरोध कशासाठी? असा सवाल उपस्थित केला.

विकासाला "खो' नको : बांदेकर 
शिवसेना नगरसेवक जीवन बांदेकर यांनी सत्ताधाऱ्यांनी शहरात होणाऱ्या अशाप्रकारच्या विकासकामाला "खो' घालू नये, असे सुनावले. शिवसेना नगरसेवक गणेश भोगटे व मेघा सुकी यांनी काळप यांच्या बाजूने भूमिका मांडली. बाळा वेंगुर्लेकर, भोगटे व काळप यांनी हा दोन कोटींचा निधी फूकट घालवू नका, असा सल्ला दिला. नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी मध्यस्थी करीत सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांना शांत करीत यावर आवश्‍यक तोडगा काढावा, असे सूचित केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com