
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात झालेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले.
चंद्रकांत पाटीलांची मिळाली सूचना आणि लगेच भाजप प्रेमींनी देवीला घातले साकडे..
मालवण (सिंधुदूर्ग) : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात झालेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येऊ दे, मुख्यमंत्री होऊ दे यासाठी आंगणेवाडीतील श्रीदेवी भराडीला साकडे घालत नवस बोलण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान भराडी देवीच्या यात्रेच्या निमित्ताने यावर्षीही मोफत चष्मा वाटप, राज्यभरातून येणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे स्वागत करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आंगणेवाडी यात्रा १७ फेब्रुवारीला होत आहे. यात्रेच्या निमित्ताने भाजपच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी आंगणेवाडी येथे नियोजन बैठक झाली. त्यापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी भराडी देवीचे दर्शन घेत राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणि मुख्यमंत्री होऊ दे यासाठी साकडे घालत नवस करण्यात आला.
हेही वाचा- सावधान ! सिंधुदूर्गात आढळले केएफडीचे तीन संशयित रुग्ण....
उपस्थिती
यानंतर भाजपच्या स्वागत कक्षाचे उद्घाटन श्री. तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी भाऊ सामंत, जयदेव कदम, विलास हडकर, धोंडी चिंदरकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, अशोक सावंत, अशोक तोडणकर, बाबा परब, महेश मांजरेकर, जेरॉन फर्नांडिस, माधवी बांदेकर, बाबा मोंडकर, दाजी सावजी, बबलू राऊत, आप्पा लुडबे, अशोक बागवे, सुधीर साळसकर, बबलू राऊत, प्रभाकर सावंत, गणेश आंगणे, आशिष हडकर, आबा हडकर, मनीषा वराडकर, अवी सामंत, वीरेश पवार, संतोष गावकर, संतोष लुडबे, बबन परुळेकर, सूर्यकांत फणसेकर, अवी पराडकर, संतोष गावकर, राजू राऊळ, प्रफुल्ल प्रभू यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा- खुशखबर :‘नडगिवे घाट’ झाला अपघातमुक्त..
भराडी देवीला नवस
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणूक, बांदा सरपंच आणि सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणि मुख्यमंत्री होऊ दे यासाठी भराडी देवीला नवस बोलण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज देवीचे दर्शन घेत नवस बोलण्यात आला. भाजपच्यावतीने गेली बारा वर्षे आंगणेवाडीत स्वागत कक्ष तसेच मोफत चष्मा वाटप, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी शिबिर, असे उपक्रम आहेत.
हेही वाचा- बिबट्या धावला शेतकऱ्याच्या अंगावर अन्...
भराडी देवीचा आशीर्वाद!
भराडी देवीच्या आशीर्वादामुळेच राज्यात भाजपची सत्ता आली होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. देवीचा आशीर्वाद पाठीशी असल्याने राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल आणि भाजपचाच मुख्यमंत्री असेल. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड, प्रमोद जठार, बाळ माने आदी उपस्थित राहणार असल्याची माहितीही श्री. काळसेकर यांनी दिली. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.