सावधान ! सिंधुदूर्गात आढळले 'केएफडी'चे तीन संशयित रुग्ण.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monkey Fever KFD Again In Sindhudurg Kokan Marathi News

सिंधुदुर्गावर ‘केएफडी’चे पुन्हा सावट..तीन संशयित रुग्ण; दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात भीती, माकडांच्या मृत्यूचे सत्र सुरूच ..

सावधान ! सिंधुदूर्गात आढळले 'केएफडी'चे तीन संशयित रुग्ण....

दोडामार्ग (सिंधुदूर्ग) : जिल्ह्यावर पुन्हा एकदा ‘केएफडी’चे संकट गडद होण्याची भीती आहे. तालुक्‍याच्या आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात केएफडीचे तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. पिकुळे, केर निडलवाडी आणि पडवे माजगाव येथील ते रुग्ण आहेत. शिवाय माकडांच्या संशयास्पद मृत्यूचे सत्र दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यात सुरू झाले आहे.

‘केएफडी’ने दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यात गेल्या काही वर्षांत धुमाकूळ घातला. त्यात अनेकांचे बळी गेले. 
एखाद्या गावात माकड मृतावस्थेत आढळते तेव्हा आजही अनेकांच्या पोटात भीतीने गोळा उठतो. साधारणपणे ऑक्‍टोबर ते मे या काळात केएफडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो. यावर्षी पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने काही काळ भीतीचे मळभ दूर झाले होते; पण कडक उन्हाळा सुरू झाल्याने केएफडीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.

हेही वाचा- खेडमधील त्या तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप

१९५७ मध्ये ‘केएफडी’चा पहिला रुग्ण...

कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्यातील क्‍यासनूर नावाच्या जंगल भागात १९५७ मध्ये ‘केएफडी’चा पहिला रुग्ण आढळला. त्या जंगलात अनेक माकडे अचानक मृत व्हायची. संशोधनानंतर त्या आजाराशी माकड आणि माकडाच्या अंगावरील पिसवांचा संबंध सिद्ध झाला आणि पहिल्यांदा तेथून प्रसार झाल्याने त्याचे नाव क्‍यासनूर फॉरेस्ट डिसीज (केएफडी) असे पडले. स्थानिक भाषेत माकडताप नाव प्रचलित झाले.

हेही वाचा- ग्रामस्थांच्या एकीने सुटला हा मोठा प्रश्न....

मृत माकड गावोगावी..
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्‍चिम घाटात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. माकडांचा नैसर्गिक अधिवास त्यामुळे धोक्‍यात आला. त्यांनी इतरत्र स्थलांतर केल्याने काही काळ केएफडीचे संकट टळले होते; पण गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा मृत माकड गावोगावी आढळत आहेत. ती नव्या संकटाची चाहूल मानावी लागेल.

हेही वाचा- रत्नागिरी जिल्हा परिषद आढावा बैठकीत ही चुक आली समोर

 उपाय म्हणून डीएमपी ऑइल

संभाव्य धोका लक्षात घेऊन मागच्या आठवड्यात जंगल भागात जाणाऱ्या लोकांसाठी अंगाला लावण्यासाठी म्हणून ३८९१ डीएमपी ऑइलच्या बाटल्या उपलब्ध केल्या आहेत. त्यातील  साडेसातशे बाटल्या जोखीमग्रस्त गावांत वाटल्या आहेत. डीएमपी ऑइल आणि फवारणीसाठी आरोग्य विभागाशी संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वांनी दक्षता घ्यावी..

केएफडीचा मृत्युदर २ ते १० टक्के असतो. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्‍यात मागच्या चार वर्षांत अनेक बळी गेले; मात्र अलीकडे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे रुग्ण बरे होत आहेत. तरीही सर्वांनी दक्षता घेण्याची गरज आहे.
- डॉ. तुषार चिपळूणकर, वैद्यकीय अधिकारी, तळकट

केएफडीचा प्रवास
  १९५७ कर्नाटक 
  २०१३ तमिळनाडू 
  २०१४ केरळ 
  २०१५ गोवा
 २०१६ महाराष्ट्र (केर, ता. दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथे 
      पहिला बळी.)
 

टॅग्स :Sindhudurg