esakal | 'ACB'चे कार्यालय आता 'आपल्या दारी'; खाते तक्रारदारापर्यंत पोचणार
sakal

बोलून बातमी शोधा

ACB

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे कार्यालय लांब असल्यानेही अनेकदा तक्रारदार इथे येणे टाळतो.

'ACB'चे कार्यालय आता 'आपल्या दारी'; खाते तक्रारदारापर्यंत पोचणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक खाते अपडेट होत असून थेट तक्रारदाराच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तक्रार घेऊन कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय ‘आपल्या दारी’ ही संकल्पना राबविणार आहे, अशी माहिती लाचलुचपत रत्नागिरीचे नूतन उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.

लाचलुचपत कार्यालयात उपअधीक्षक पदावर रुजू झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण यांनी यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक म्हणून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात काम केले होते. सध्या ते बढतीने रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आले आहेत. यावेळी ते म्हणाले की, भ्रष्टाचार सर्वत्र असतोच. समाजाचे काम योग्य पद्धतीने चालावे यासाठी या प्रकारांना पायबंद घालणे आवश्यक असते; मात्र काही अडचणींमुळे किंवा काही गैरसमजुतीमुळे तक्रारदार यासाठी तक्रार द्यायला पुढे येत नाहीत. जोपर्यंत सहन करणे शक्य आहे, तोपर्यंत अनेकदा अशा प्रकारांना अप्रत्यक्षपणे खतपाणीच घातलेले दिसून येते. तक्रारदारांच्या अडचणींवर मात करण्यासाठी खात्यातर्फे विचार सुरू आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती अडचणीची आहे.

हेही वाचा: मुलांच्या सार्वत्रिक लसीकरणाची अद्यापही शिफारस नाही - नीती आयोग

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे कार्यालय लांब असल्यानेही अनेकदा तक्रारदार इथे येणे टाळतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता लाचलुचपत प्रतिबंधक खाते आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात येणार असून तक्रारदाराने आमच्याशी संपर्क साधला आणि तो लांब राहणार असेल तर आमची टीम तिथे जाऊन त्याची तक्रार दाखल करून घेऊ शकते. त्याशिवाय याच माध्यमातून तक्रार दिल्यानंतर जबाब, अन्य कागदपत्रे यासाठी होणारी तक्रारदाराची धावपळ सुद्धा कमी केली जाणार आहे. यातून तक्रारदाराचा वेळ, पैसेसुद्धा वाचणार आहेत. याशिवाय तक्रारदार व्हॉट्सअॅपद्वारेही तक्रार देऊ शकणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खात्याचा कारभार मर्यदित नाही

कामासाठी पैसे मागणे इतक्यापुरताच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा कारभार मर्यदित नाहीत तर कोणत्याही शासकीय योजनेमध्ये भ्रष्टाचार असेल किंवा कोणीही अधिकची संपत्ती जमा केली असेल तर त्याच्याविरुद्ध सुद्धा कारवाई करता येते. नागिरकांनी विश्वासाने संपर्क करावा आणि भ्रष्टचारमुक्त समाजासाठी सहकार्य करावे. त्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकासह मारुतीमंदिर येथील लाचलुचपतच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

हेही वाचा: "...वह योगी कैसा?" राहुल गांधींनी थेट साधला आदित्यनाथांवर निशाणा

दृष्टिक्षेपात...

  • जबाब, कागदपत्राचा वेळ वाचणार

  • तक्रारदाराची धावपळ कमी होणार

  • तक्रारदाराचा वेळ, पैसे वाचणार

  • व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार देऊ शकणार

loading image
go to top