
तालुक्यामध्ये शिक्षण घेऊन रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये मोठ्या संख्येने युवा वर्ग आहे. मात्र, त्यांच्या हाताला काम देणारा कोणताही प्रकल्प नाही. त्यातून, रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिकांचे मुंबईत स्थलांतर झाल्याने अनेक गावांमधील बहुतांश घरे बंद स्थितीमध्ये असतात.
राजापूर ( रत्नागिरी ) - आंबोळगड समुद्र किनाऱ्यावर उभारल्या जात असलेल्या आयलॉग प्रकल्पाला शासनाने स्थगिती दिली असताना या प्रकल्पाचे जोरदार समर्थन करीत राजापूरच्या विकासासाठी अशा प्रकल्पाची आवश्यकता असल्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केली आहे. सर्वच प्रकल्प हद्दपार होणार असतील तर, तालुक्याचा विकास आणि रोजगार निर्मिती कशी होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - नाणारनंतर आता राजापुरात आयलॉगचे रण
रोजगार निर्मितीच्या दृष्टीने तालुक्यात येऊ घातलेल्या आणि आलेल्या विविध प्रकल्पांना तीव्र विरोध केला गेला असून आजही केला जात आहे. त्यातून, प्रकल्प विरोधकांचे संख्याबळ जास्त असल्याचे चित्र दिसून येते. मात्र, आता हळूहळू प्रकल्प समर्थकांचेही संख्याबळ आणि आवाज वाढू लागला असून प्रकल्प समर्थकांच्या भावनांना भाजपचे तालुकाध्यक्ष गुरव यांनी वाट मोकळी करून दिली आहे.
तालुक्यामध्ये शिक्षण घेऊन रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये मोठ्या संख्येने युवा वर्ग आहे. मात्र, त्यांच्या हाताला काम देणारा कोणताही प्रकल्प नाही. त्यातून, रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिकांचे मुंबईत स्थलांतर झाल्याने अनेक गावांमधील बहुतांश घरे बंद स्थितीमध्ये असतात. याला नेमके जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एखादा प्रकल्प झाल्यास त्यातून स्थानिकांना विविध प्रकारची रोजगार निर्मिती होते. त्यामुळे तालुक्यामध्ये प्रकल्प झाल्यास शिक्षित वा सर्वसामान्य युवा वर्गाच्या हाताला काम मिळवून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न स्थानिक पातळीवरच सुटणार आहे. मात्र, तसे न करता केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी विरोध करून तालुक्यात आलेल्या आणि काही येऊ घातलेल्या प्रकल्पांना हटविण्याचे प्रयत्न केले गेले हे राजापूरवासीयांचे दुर्दैव असल्याचेही गुरव यांनी सांगितले. आयलॉग प्रकल्प होणे गरजेचे असून त्यासाठी भाजपा संघर्ष करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - महाभारताचा काळ हा ख्रिस्तपूर्व 5561 वर्ष
तालुक्यात आलेल्या विविध प्रकल्पांना विरोध करण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी आघाडीवर होते. प्रकल्प विरोधकांचे नेतृत्व करणाऱ्या आमदार, खासदार यांना त्यातून निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय फायदा मिळाला. मात्र, स्थानिकांच्या हाताला काम देवून रोजगार निर्मितीसाठी त्यांनी काय केले, असा सवाल गुरव यांनी केला. राजापूरच्या लोकांच्या व्यथा जाणणे व त्या सोडविण्यास स्थानिकच नेता वा लोकप्रतिनिधी हवा, असा टोलाही त्यांनी हाणला.
आयलॉग प्रकल्प हा औष्णिक नसून त्याच्यामुळे प्रदूषण होणार नाही. उलट त्यातून उद्योग आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाचे नाटे ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या माध्यमातून यापूर्वीच समर्थन केले असून पुढील निर्णय घेण्यासाठी ग्रामस्थांची लवकरच बैठक होणार आहे. हा प्रकल्प का हवा हे पटवून देण्यासह सांगण्यासाठी लवकरच आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहोत. आमचे नेते आमचे म्हणणे ऐकून घेऊन निश्चितच आम्हाला न्याय देतील असा विश्वास आहे.
- डॉ. सुनील राणे, नाटे