जातपडताळणी कार्यालयात तब्बल १४८४ अर्ज पडून | Chiplun | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जात प्रमाणपत्र पडताळणी

चिपळूण : जातपडताळणी कार्यालयात तब्बल १४८४ अर्ज पडून

चिपळूण : महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असताना जातपडताळणी विभागाचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. रत्नागिरी येथील जातपडताळणी कार्यालयात तब्बल १४८४ अर्ज पडले आहेत. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेला जातपडताळणी दाखला विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध होत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत पालकांची चिंता वाढली आहे.

शासनाच्या नियमानुसार, विविध विभाग, प्राधिकरण व पदावर आरक्षित अशा विशिष्ट प्रवर्गात नोकरी मिळवण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षित जगावर निवडणूक लढवण्यासाठी आणि विशेष म्हणजे महाविद्यालयात आरक्षित कोठ्यात प्रवेश मिळवण्यासाठी जातीचा दाखला बरोबरच जातपडताळणी असणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने वेगळा विभाग निर्माण करून अधिकाऱ्यांच्या समित्यादेखील नियुक्त केल्या आहेत.आता ही प्रक्रिया ऑनलाइनदेखील करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी रत्नागिरी कुवारबाव येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगली : एसटी वाहकाच्या मृत्यूने संसार उघड्यावर

परंतु येथील कार्यालयाच्या कारभाराबाबतच आता शंका उपस्थित करण्यात येत आहेत. येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची एकूण १० पदे आहेत परंतु येथे फक्त ३ अधिकारी काम करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जानेवारी, फेब्रुवारीपासून जून महिन्यापर्यंत येथे हजारो विद्यार्थ्यांनी जातपडताळणीकरीता अर्ज दाखल केले आहेत; मात्र येथे तब्बल १४८४ अर्ज अद्यापही पडून आहेत. त्यापैकी ३८९ प्रकरणे तयार आहेत तसेच ५०० जातपडताळणी प्रकरणे तपासणी समितीकडे पाठवण्यात आली आहेत तर ५०० प्रकरणे आता तयार होत आहेत. १८ नोव्हेंबरपासून महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. प्रवेशप्रक्रियेचे कॅप राउंड २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेसाठी जातपडताळणी अत्यावश्यक आहे. जर वेळेत जातपडताळणी उपलब्ध झाली नाही तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आरक्षित प्रवर्गात प्रवेश मिळणार नाही परिणामी खुल्या गटातून लाखो रुपये भरून प्रवेश घ्यावा लागेल. त्यामुळे हजारो विद्यार्थी महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालावे

चिपळूणचे नगरसेवक अविनाश केळसकर यांनी रत्नागिरी कार्यालयात याबाबत सर्व माहिती घेतली तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री व येथील आमदारांनी लक्ष घालावे व ही समस्या लवकरात लवकर निकाली काढावी, अशी मागणी केली आहे; अन्यथा हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

loading image
go to top