सिटी सर्वेक्षण लांबले; विकास आराखड्याचे काम थांबले

ऑक्टोबर २०१० मध्ये झाले होते काम सुरू
City survey development Work plan stalled ratnagiri
City survey development Work plan stalled ratnagiri sakal

राजापूर शहरातील भविष्यातील लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेवून सुयोग्य नियोजन करून शहर विकास करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती गोळा करणे आणि अद्ययावत नकाशा मिळण्यासाठी आवश्यक असलेले सिटी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे हे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. त्यामध्ये सिटी सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदार कंपनीने केलेल्या कामाची फेरतपासणी करण्याचे काम सध्या भूमिअभिलेख विभागाने हाती घेतले आहे. तेही अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे संथगतीने सुरू असून पूर्ण कधी होणार, याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे दशकभराचा कालावधी लोटल्यानंतरही सिटी सर्वेक्षणच्या अहवालासाठी आणखी किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बाराव्या वित्त आयोगाचा निधी

शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक असलेला अद्ययावत नकाशा असणे गरजेचे आहे. याच पार्श्‍वभूमीवर शहराचे सिटी सर्वेक्षण व्हावे, यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष आणि माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या नेतृत्वाखाली नगर पालिकेने संबंधित खात्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला. त्याची शासन दरबारी दखल घेवून २००५-०६ मध्ये संबंधित खात्याकडून शहराच्या सिटी सर्वेक्षणच्या कामाला मान्यता मिळाली. यासाठी येणाऱ्‍या खर्चापोटी पालिकेने १२ व्या वित्त आयोगातून सुमारे २३ लाख १० हजारांचा निधीही मंजूर करून संबंधित खात्याकडे पालिकेने जमा केला.

सिटी सर्वेक्षणाद्वारे माहिती होणार संकलित

या सिटी सर्वेक्षणमध्ये डि.जी.पीएस् तंत्राद्वारे सर्वेक्षण करून शहराची सविस्तरपणे माहिती गोळा करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागांमध्ये जाणारे छोटे-मोठे कच्चे आणि पक्क्या स्वरूपातील रस्ते, शहरातील एकूण इमारती, कंपाऊंड वॉल, गटारांची संख्या, शहरातील पाण्याची व्यवस्था, शहराची हद्द आदींविषयी माहिती गोळा केली जाणार आहे.

सर्वेक्षणामुळे हे माहिती होणार..

या सर्वेक्षणामुळे शहरातील अविकसित राहिलेला भाग कोणता हे स्पष्ट होणार आहे. शहराच्या कागदोपत्री असलेली हद्दीमध्ये नोंद असूनही सर्वमान्यांना मात्र तो ज्ञात नाही, तो भाग उजेडात येणार असून साऱ्‍यांना ज्ञातही होणार आहे. त्यातच, शहरातील एखाद्या भागाचा विकास करायचा असेल तर, त्याचा कशाप्रकारे विकास करणे शक्य आहे, याविषयी मार्गदर्शनही या सिटी सर्वेक्षणमुळे होणार आहे. त्यातच शहराची अद्ययावत रचनाही स्पष्ट होणार आहे. शहरातील किती भाग लोकांकडून सध्या वापरात आहे, याबाबतही माहिती पुढे येणार आहे.

विकास आराखड्यासाठी महत्वपूर्ण

राजापूर शहराचा नियोजनबद्द विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी भविष्यात प्रयत्न होण्याची शक्यता आहे. हा विकास आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक असलेली विविध आणि अत्यावश्यक माहिती, शहराची हद्द स्पष्ट करणारा अद्ययावत नकाशा या सिटी सर्वेक्षणद्वारे मिळणार आहे. त्यामुळे या सिटी सर्वेक्षणला विशेष महत्व आहे.

प्रॉपर्टी कार्ड मिळण्यामध्ये महत्वपूर्ण

शहरातील जमीन मालकांची नावे त्यांच्या सात-बारा उतार्‍यांना नोंद आहेत. मात्र, सिटी सर्वेक्षण झाल्यानंतर मुंबईच्या धर्तीवर भविष्यात शहरातील जमीन मालकांना त्यांच्या जमिन वा अन्य मालमत्तेची माहिती देणारे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.

अजूनही दीड वर्षाचा कालावधी

कामाचा आरंभ झाल्यानंतर ठेकेदार कंपनीने पहिल्या टप्प्यातील सिटी सर्व्हेक्षणचे आपले काम पूर्ण केले आहे. त्यामध्ये धोपेश्‍वर येथील ५ जार ६३३, राजापूर शहर ७ हजार ९६२, तर कोंढेतड येथील ३ हजार ३६७ मिळकतींचा समावेश आहे. या ठेकेदार कंपनीने केलेल्या कामाची भूमीअभिलेख विभागाकडून फेरतपासणी केली जात आहे. त्यामध्ये धोपेश्‍वरच्या ५ हजार ६३३ मिळकतींपैकी ३५६१ मिळकतींच्या फेरतपासणीचे काम पूर्ण झाले आहे. अद्यापही राजापूर शहर आणि कोंढेतड येथील मिळकतींच्या फेरतपासणीचे काम शिल्लक आहे. उर्वरित मिळकतींच्या फेरतपासणीचे काम पूर्ण करण्यासाठी अजूनही सुमारे एक ते दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एवढ्या मिळकतींचे सर्वेक्षण

  • धोपेश्‍वर येथील ५ हजार ६३३

  • राजापूर शहर ७ हजार ९६२

  • कोंढेतड येथील ३ हजार ३६७

  • धोपेश्‍वरातील मिळकतींच्या फेरतपासणीचे काम पूर्ण ३५६१

नेमकं घडलंय काय ?

  • २००५-०६ मध्ये सिटी सर्वेक्षणाला मान्यता

  • सुमारे २३ लाख १० हजारांचा निधीही मंजूर

  • शहराच्या ४३१. १९ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण

  • ठेका पुणे येथील एका कंपनीला देण्यात आला

  • ऑक्टोबर २०१० मध्ये कामाला केला आरंभ

दृष्टिक्षेपातील राजापूर शहर

  • स्थापना १९४०

  • क्षेत्रफळ ६.१९ चौ. कि. मी.

  • लोकसंख्या १० हजार ४९९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com