काँग्रेस कार्यकर्त्यांनो, पक्ष वाढीसाठी कामाला लागा : मुजफ्फर हुसेन

रुपेश हिराप
Tuesday, 18 August 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये बळ आणण्यासाठी व नवचैतन्य देण्यासाठी मुजफ्फर हुसेन दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्हा कॉंग्रेस कमिटी व्यतिरिक्त अन्य कोणतीही संघटना कॉंग्रेसशी संबंधित नसून बाळा गावडे हेच सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यतेखाली नेमलेली प्रत्येक तालुका कार्यकारणी अधिकृत आहे. त्यामुळे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी आज येथे केले. 

वाचा - मिर्‍या बंधार्‍याचे दुखणे होणार नाहीसे ; ‘नरीमन’च्या धर्तीवर प्रकल्प अहवाल तयार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये बळ आणण्यासाठी व नवचैतन्य देण्यासाठी मुजफ्फर हुसेन दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांचे सावंतवाडीत आगमन होताच तालुका कार्यकारणीच्यावतीने जिल्हाध्यक्ष बाळा गावडे तसेच तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्वागत केले. यानंतर आयोजित बैठकीत पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केले.

व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. दिलीप नार्वेकर, माजी जिल्हा कॉंग्रेस युवक अध्यक्ष विलास गावडे, प्रांतिक सदस्य विजय कुडतरकर, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर आदी उपस्थित होते. 
यावेळी जिल्हाध्यक्ष गावडे यांनी प्रदेश कॉंग्रेसने आपली निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात कोरोनाचा शिरकाव  

कोरोना संक्रमण काळात जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली; मात्र न डगमगता आपण जिल्ह्यात काम करत असून येत्या काळात जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष नक्कीच उभारी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, सावंतवाडी कॉंग्रेस प्रवक्ते संभाजी सावंत, अन्वर खान, प्रदीप सावंत, अभय किनळोस्कर, रुपेश आईर, गुरु आईर, बाबा राऊळ, अमिदी मेस्त्री, अशा कंटक, चैतन्य सावंत, दिगंबर परब, मोहसीन मुल्ला, संजय राऊळ आदी उपस्थित होते. 

यापुढे स्वबळावर निवडणुका 
श्री. हुसेन म्हणाले, ""महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने बाळा गावडे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले असून तेच जिल्हाध्यक्ष आहेत. प्रत्येक तालुक्‍यात ज्या कार्यकारिणीला मान्यता दिली आहे आणि जी कार्यकारिणी निवडली आहे तीच कार्यकारणी आणि तालुकाध्यक्ष अधिकृत आहेत. सावंतवाडी तालुक्‍यातील कुठलेही काम असल्यास तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी थेट संपर्क साधावा. कॉंग्रेस पक्ष यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल. जिल्हा कॉंग्रेस देईल त्याच उमेदवाराला प्रदेश निवडणुकीसाठी मान्यता मिळेल. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Muzaffar Hussain visit konkan Sindhudurg