सामान्यांपासून श्रीमंतही बाधित, 20 जणांचा मृत्यू, कुठली ही स्थिती?

मुझफ्फर खान
Thursday, 13 August 2020

तो गरीब-श्रीमंत असा भेद करत नाही; मात्र उपचार घेण्यासाठी श्रीमंत हा खासगी हॉस्पिटलमध्ये तर गरीब हा जिल्हा रुग्णालयात मिळेल, तेथे उपचार घेत आहे. 

चिपळूण (रत्नागिरी) - शहरातील प्रत्येक भागात कोरोनाचा रुग्ण आहे. अगदी साध्या किरकोळ भाजीविक्री करणाऱ्यांपासून श्रीमंतालाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात लोकप्रतिनिधी, डॉक्‍टर, पोलिस यांचाही समावेश आहे; मात्र बाधित झालेल्या रुग्णांना आपल्याला बाधा नेमकी कुठे झाली, हे समजत नाही. जेव्हा ताप येतो, कणकण येते, तेव्हाच बाधित झाल्याचे समजते. शहरात बाधितांची संख्या वाढत आहे. 

वाचा - आज परत सांगतो.. पार्थ लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा.

चिपळूण शहर हे जिल्ह्यात कोरोनाबाधित म्हणून नंबर दोनचे म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. बाधित रुग्णांमध्ये डॉक्‍टर, स्थानिक लोकप्रतिनिधी, उद्योजक आढळून येत आहेत. सुरवातीच्या काळात खेर्डी आणि गोवळकोट रोडमधील एका इमारतीपुरता कोरोनाचा उद्रेक झाला होता; मात्र आता त्याने संपूर्ण शहर व्यापले आहे. सर्वाधिक धोकादायक म्हणजे कोरोनामुळे 20 जण दगावले आहेत.

यातील दहाजण शहरी भागातील तर दहा ग्रामीण भागातील आहेत. बाधित आणि दगावणाऱ्यांचे वय 50 पेक्षा पुढे आहे. बाजारपेठ अनलॉक झाल्यापासून प्रत्येक वॉर्डात रुग्ण आढळत आहेत. सर्व व्यवहार सुरळीत झाल्यापासून बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. या गर्दीत नागरिकांना कोठे बाधा होते, ते समजत नाही. चिपळूण तालुक्‍यातील आढळून आलेल्या बाधितांचा आकडा काही कमी होत नाही. 

हेही वाचा - तुम्हाला माहित आहे का? या गावाला तूळशी वृंदावनाचे गाव का म्हणतात? वाचा, या अनोख्या गावाची कहाणी
 

मिळेल तेथे उपचार 
एक तर घरात बसून करायचे काय? पोटाला खायचे काय? रोजगार उद्योग नसल्याने बाहेर पडावेच लागत आहे. किती जरी काळजी घेतली तरी कोरोना हा चिकटत आहे. तो गरीब-श्रीमंत असा भेद करत नाही; मात्र उपचार घेण्यासाठी श्रीमंत हा खासगी हॉस्पिटलमध्ये तर गरीब हा जिल्हा रुग्णालयात मिळेल, तेथे उपचार घेत आहे. 

कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापासून वाचायचे असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. प्रतिकारशक्ती वाढवणे हेच यावरचे उपाय आहेत. या संदर्भात लोकांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत. 
- नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, चिपळूण 

दृष्टिक्षेपात.. 
उपचार सुरू असलेले ः- 259 
बरे झालेले कोरोनाग्रस्त ः- 424 
एकूण दगावलेले कोरानाग्रस्त ः- 20 
एकूण ः- 703 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact chiplun konkan ratnagiri