क्वारंटाईन व्यक्तीचीच दादागिरी ; नागरी कृती दलाच्या सदस्यालाच केली मारहाण..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

होम क्वारंटाईनमधील व्यक्ती बाहेर फिरते म्हणून चौकशी केल्याच्या रागातून  केली मारहाण... 

 

गुहागर (रत्नागिरी)  : होम क्वारंटाईनमधील व्यक्ती बाहेर फिरते म्हणून चौकशी केल्याच्या रागातून नागरी कृती दलाचे सदस्य संजय कदम यांना बेदम मारहाण केली. ही घटना गुहागर शहरातील प्रभाग क्र. 7 मध्ये घडली. यासंदर्भात संजय कदम यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संजय कदम यांनी गुहागर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुरववाडीतील रविराज बेंडल हे पुण्यातून गुहागरला आले आहेत. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र गेले काही दिवस नियम बाजूला ठेवून ते शहर परिसरात फिरत होते. नागरी कृती दलाचे सदस्य असलेले संजय कदम यांच्या निर्दशनास ही गोष्ट आली. त्यामुळे त्यांनी बेंडल यांची होम क्वारंटाईनची मुदत संपली आहे का अशी विचारणा नगरपंचायत कर्मचारी सुनील नवजेकर, तसेच कृती समितीचे सदस्य दिलीप गुरव यांच्याकडे केली.

हेही वाचा- अबब -  एका मिरचीच्या झाडाला लागल्या 8 किलो मिरच्या.....

त्याचा राग येवून रविराज बेंडल, धनंजय दणदणे, अशोक बेंडल यांनी संजय कदम यांना शुक्रवारी (ता. 22) रात्री 7.45 वा. बेदम मारहाण केली. तसेच हे भांडण सोडविण्यास आलेल्या प्रतीक्षा संजय कदम यांनाही शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिसांनी संजय कदम यांची तक्रार दाखल करून घेतली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा- कोल्हापूरच्या अधिष्ठाताच्या बदलीला अचानक खो..

परगावातून तालुक्यात आलेल्यांपैकी होम क्वारंटाईन केलेल्या अनेक व्यक्ती निर्धास्तपणे बाजारात फिरत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. यासंदर्भात ग्रामस्थ ग्राम कृती दल, लोकप्रतिनिधी, पोलिस यांच्याकडे तक्रारीही करत आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप यावर कारवाई केलेली नाही. या घटनेतही मारहाण होण्यापूर्वी नागरी कृती दलाच्या सदस्याने नगरपंचायत कर्मचार्‍याला माहिती दिली होती. मात्र नगरपंचायत व्यवस्थापनाने वेळीच कार्यवाही केली नाही. किरकोळ घटनेचे बेदम मारहाणीत पर्यवसान झाले. त्यामुळे होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींवर कारवाई कोण करणार असा प्रश्न सध्या ग्रामस्थ विचारत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime case in guhagar ratnagiri