पिंजऱ्यात मिळणार मगरींना जीवदान....

crocodile  giving life top in Chiplun state kokan marathi news
crocodile giving life top in Chiplun state kokan marathi news

चिपळूण (रत्नागिरी) : मानवी वस्तीमध्ये आलेल्या आणि संकटात सापडलेल्या मगरींना पकडून सुरक्षित अधिवासात सोडण्यात चिपळूण वनविभागाने सर्वाधिक यश मिळवले आहे. शनिवारी (ता. 8) गोवळकोट येथे मगर पकडण्यात आली. तीन वर्षात 47 मगरींना जीवदान देण्याचे काम वनविभागाने केले. सर्वाधिक मगरींना जीवनदान देणारा म्हणून चिपळूण वनविभाग राज्यात अव्वल ठरला आहे.

 याबाबत माहिती देताना वनविभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख म्हणाले, गोवळकोट खाडीत मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. शहराची समुद्र सपाटीपासूनची उंची 10.976 मी. आहे. जास्त पर्जन्यमानामुळे खाडीतील पाणी शहरात येऊन पूरपरिस्थिती निर्माण होते. पुराच्या पाण्याबरोबर असंख्य मगरी शहरांमध्ये मानवी वस्तीत येतात. शहरातील नाल्यामध्येही मगरींचा वावर असतो. तालुक्‍यातील खाडीकिनारी वसलेल्या गावांमध्येही मगरी आढळतात. 2017 पूर्वी चिपळूण परिसरात मानवी वस्तीत आलेल्या मगरी पारंपरिक पद्धतीने पकडल्या जात होत्या.

मगरी पकडण्यासाठी पिंजरा

2017 नंतर एका विशिष्ट पद्धतीने मगरी पकडण्यासाठी पिंजरा तयार करण्यात आला आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये जास्त मनुष्यबळ, वेळ व जोखमीने काम करावे लागत होते. मगरीला इजा होण्याची शक्‍यताही या प्रकारात असते. वेगवेगळ्या ठिकाणी मगर पकडताना येथील कर्मचाऱ्यांना आलेल्या अनुभवातून आधुनिक पिंजरा तयार करण्यात आला. या पिंजऱ्याच्या साहाय्याने संकटात सापलेल्या मगरीला पकडून सुरक्षित अधिवासात सोडले जाते.

शासनाच्या टोल फ्री क्रमांकाचा आधार
गोवळकोट रोड येथील महेंद्र शिंदे यांच्या शेतघराजवळील विहिरीमध्ये मगर असल्याची माहिती शनिवारी (ता. 8) हॅलो फॉरेस्ट या शासनाच्या टोल फ्री क्रमांकावरुन देण्यात आली. 
परिक्षेत्र अधिकारी निलख, वनरक्षक आर. आर. शिंदे, रामदास खोत, आर. पी. बंबर्गेकर घटनास्थळी पोहचले. विहिरीमध्ये प्रचंड गाळ साचलेला आढळून आला. त्यातून मगरीला सुरक्षित बाहेर काढण्याचे आव्हान होते. तरीही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्याच्या साहाय्याने मोठ्या शिताफीने मगर पकडून तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. 


हॅलो फॉरेस्ट (1926) या क्रमांकावरून संपर्क साधा
लोकवस्तीमध्ये वन्यजीव आढळून आले किंवा एखाद्या संकटात सापडलेले वन्यजीव आढळून आले तर ग्रामस्थांनी आम्हाला हॅलो फॉरेस्ट (1926) या क्रमांकावरून संपर्क साधावा. वनविभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोचून वन्यजीवांना जीवनदान देतील तसेच त्यांना सुरक्षित अधिवासात सोडून देतील. 
-सचिन निलख, परिक्षेत्र वनाधिकारी चिपळूण. 

तीन वर्षात आढळलेल्या मगरी 
2017 - 11 
2018 - 15 
2019 - 21 
एकूण - 47  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com